महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ जानेवारी ।। चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आता आयसीसीने पाकिस्तानला लास्ट वॉर्निंग दिली आहे. आयसीसीने आता पाकिस्तानला एक तारीख दिली आहे, तोपर्यंत जर चॅम्पियन्स ट्रॉफाची तयारी पूर्ण झाली नाही तर ही स्पर्धा आता दुसरीकडे हलवण्यात येईल, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.
चॅम्पियन्स करंडक वनडे क्रिकेट स्पर्धा जेमतेम सहा आठवड्यांवर आली आहे. मात्र या स्पर्धेसाठी स्टेडियम पूर्णपणे तयार नसल्याचे चित्र आहे. पाकिस्तानने मात्र स्टेडियम पूर्वनिश्चित वेळेवर पूर्ण होतील, असे सांगितले. त्याचवेळी चॅम्पियन्स स्पर्धेची रंगीत तालीम असलेल्या तिरंगी स्पर्धेतील लढती कराची आणि लाहोरला होतील असे जाहीर केले आहे.
कराचीतील नॅशनल स्टेडियम, लाहोरचे गडाफी स्टेडियम आणि रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील पाकिस्तानातील लढती होणार आहेत. मात्र या स्टेडियमचे बांधकाम अजूनही सुरू आहे. या स्टेडियमचे काम पूर्ण होण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर होती. मात्र हे काम पूर्ण झालेले नाही, त्यामुळे आयसीसीची चिंता वाढली आहे. स्टेडियमच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयसीसीचे पथक पुढील आठवड्यात पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. कारण आता पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी करण्यासाठी २५ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे.
पाकिस्तानातील स्टेडियमचे नूतनीकरण होत नसून, जवळपास नव्याने उभारणी होत आहे. अजूनही स्टँडमधील सीट वसवलेल्या नाहीत. विद्युतझोत बसवण्याचे काम सुरू आहे. एवढेच नव्हे तर मैदान आणि खेळपट्टी तयार करण्यास सुरुवातही झालेली नाही. मात्र आयसीसीने याबाबत तूर्तास तरी टिपणी करणे टाळले आहे. कराची आणि लाहोर या स्टेडियममधील हॉस्पिटॅलिटी बॉक्स, ड्रेसिंग रुम याचे कामही अंतिम टप्प्यात आलेले नाही.
पाकिस्तानात सध्या खूपच थंडी वाढली आहे. त्यातच धुकेही असते. त्यामुळे कामाच्या गतीसही वाढ देता येत नाही. लाहोरच्या स्टेडियमच्या बाह्यभागाचे प्लॅस्टर काम सुरू आहे. या स्टेडियमसह नॅशनल स्टेडियमच्या काही भागाच्या नूतनीकरणाची योजना लांबणीवर टाकली असल्याचीही चर्चा आहे.
आयसीसीचे तोंड अमेरिकेतील वर्ल्ड कप टी-२० लढतीच्या संयोजनाने पोळले आहे. स्टेडियम वेळेत पूर्ण न झाल्यास आयसीसी स्पर्धा पूर्णपणे संयुक्त अरब अमीरातीत घेण्याचा विचार करू शकेल. स्पर्धा पूर्णपणे तयार नसलेल्या स्टेडियमवर होणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे.