महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० जानेवारी ।। पुणे मेट्रोने प्रवाशांसाठी एक आनंददायी निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार, जानेवारी २०२५ च्या अखेरीपासून मेट्रो सेवा रात्री ११.०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सध्या, वनाझ-रामवाडी आणि पिंपरी-स्वारगेट कॉरिडॉरवरील शेवटच्या गाड्या रात्री १०.०० वाजता सुटतात. मात्र, हा वेळ एक तास वाढवण्यात आला आहे, ज्यामुळे हजारो पुणेकरांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा निर्णय अत्यंत फायदेशीर ठरणार असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील हा बदल प्रवाशांच्या वेळेची मोठी बचत करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पुणे मेट्रोने आता सकाळी ६.०० ते रात्री ११.०० वाजेपर्यंत सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री १०.०० नंतर प्रत्येक मार्गावर १० मिनिटांच्या अंतराने ६ अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. या सुविधेमुळे उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. शेवटची मेट्रो पकडण्यासाठी होणारी धावपळ कमी होऊन प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी होणार आहे.
प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे आणि रेल्वे स्थानक, विमानतळ, येथून येणार्या प्रवाशांसह रात्री उशिरापर्यंतच्या प्रवाशांना सामावून घेण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक १० मिनिटांनी ट्रेन धावण्याचे नियोजन असणार आहे. १ जानेवारी २०२५ रोजी, पुणे मेट्रोने २०००,००० हून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन, कामकाजाची वेळ वाढविण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला आहे.
पुणे मेट्रोचा तिसरा मार्ग कधी सुरु होणार?
पुणेकरांसाठी हिंजवडी ते शिवाजीनगर या २३ किमी लांबीच्या तिसऱ्या मेट्रो मार्गाच्या प्रतीक्षेचा कालावधी वाढला आहे. सुरुवातीला हा मार्ग मार्च २०२५ पर्यंत सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आचारसंहिता आणि इतर अडथळ्यांमुळे प्रकल्पाला उशीर झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता हा मेट्रो मार्ग सप्टेंबर २०२५ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर हिंजवडी आयटी हबमधील दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कामाचा वेग वाढवून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.