व्हॉट्सअ‍ॅपवरही मिळणार पीएमपी बसचे तिकीट, ऑनलाइन तिकिटाला प्रवाशांचा प्रतिसाद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० जानेवारी ।। नागरिकांच्या सोयीसाठी पीएमपीने ऑनलाइन तिकीट काढण्याची सोय उपलब्ध करून दिल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवरदेखील तिकिटाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना तिकीट काढण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असणार आहेत.

पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीत प्रवासी सेवा दिली जाते. यातून दैनंदिन 11 ते 12 लाख नागरिक प्रवास करतात. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळानुसार पीएमपीकडून प्रवाशांच्या सोयीसाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामध्ये अगोदर प्रवाशांना क्यूआर कोडवरून तिकिटाचे पैसे देण्याची सोय करण्यात आली होती. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर पीएमपीकडून बस लाइव्ह दिसणारे आणि तिकीट ऑनलाइन काढण्यासाठी अ‍ॅप सुरू करण्यात आले. त्यालादेखील चांगला प्रतिसाद मिळत असून, दैनंदिन एक लाख प्रवाशांकडून अ‍ॅपवरून तिकीट काढण्यात येत आहे.

आता पीएमपीने त्याच्या पुढचे पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना थेट व्हॉट्सअ‍ॅपवरून तिकीट काढण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठीचे पीएमपीकडून तांत्रिक काम सुरू आहे. यासाठीची सर्व तयारी पूर्ण होत आली आहे. त्यामुळे प्रवाशांना ऑनलाइन तिकीट काढण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *