महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० जानेवारी ।। देशांतर्गत बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा तेजीची तुतारी फुंकली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूच्या किंमतीत सतत तेजी-मंदी पाहायला मिळत असून अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे महागाई वाढू शकते, ज्यामुळे व्याजदर कपातीची शक्यता आणखी कमी होऊ शकते, अशी चिंता असून यामुळे सोन्याच्या खरेदीला पुन्हा एकदा उधाण आले आहे. त्याचवेळी, आर्थिक मंदी आणि व्याजदर कपातीदरम्यान सोन्याच्या किंमती वाढतात.
सोन्याची दरवाढ सुरूच
शुक्रवारी सकाळी सकारात्मक जागतिक संकेतांमध्ये MCX वर सोन्याचा भाव ०.२२% वाढून प्रति १० ग्रॅम ७८,२७२ रुपयांवर व्यवहार करत होता. वाढत्या अमेरिकन बाँड यिल्ड्स आणि मजबूत यूएस डॉलरमुळे मौल्यवान धातूच्या वाढीवर मर्यादा आली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर चार आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर उसळले असून नोव्हेंबरच्या मध्यापासून सोन्याच्या किंमतीत सतत वाढीचा कल पाहायला मिळत आहे. मात्र, यूएस ट्रेझरी उत्पन्न आठ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर असल्याने सोन्याच्या किमतींसाठी एक प्रमुख धोका निर्माण झाला आहे.
सोन्या-चांदीचा भाव काय
जागतिक बाजारातील सकारात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याची किंमत सलग तिसऱ्या सत्रात ३०० रुपयांनी वाढून ८०,३०० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. चीनची मध्यवर्ती बँक, पीपल्स बँक ऑफ चायना (पीबीओसी) ने सलग दुसऱ्या महिन्यात आपल्या साठ्यात वाढ केल्याचे वृत्त दिल्यानंतर मौल्यवान धातूच्या किंमतीत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
गेल्या सत्रात ९९.९% शुद्धतेच्या सोन्याचा भाव ८०,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद क्लोज झाला होता. गुरुवारी ९९.५% शुद्धतेच्या सोन्याचा भाव ३०० रुपयांनी वाढून ७९,९०० रुपये प्रति १० ग्रॅम तर चांदीचा भाव ५०० रुपयांनी वधारला आणि ९३,००० रुपये प्रति किलो झाला, जो आधी ९२,५०० रुपये प्रति किलो होता.