महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ जानेवारी ।। ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये जखमी झालेला जसप्रीत बुमराह आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या ग्रुप स्टेजमधून बाहेर पडू शकतो. सिडनीत खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटीत त्याच्या पाठीला दुखापत झाली होती. त्याला फ्रॅक्चर झाले नसले तरी सूज नक्कीच आहे, असे सांगण्यात येत आहे. त्याला एनसीएला रिपोर्ट करण्यास सांगितले आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा आहे. असे झाल्यास तो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाद फेरीतील सामन्यांमध्ये पुनरागमन करू शकतो.
बुमराहबद्दल निवडसमिती काय निर्णय घेणार?
चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, तर अंतिम सामना ९ मार्च रोजी होणार आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, निवडसमिती बुमराहचा १५ खेळाडूंच्या संघात समावेश करायचा की त्याला स्पर्धेसाठी राखीव खेळाडूंच्या यादीत समाविष्ट करायचे यावर विचार करत आहेत. बीसीसीआय प्रथम हंगामी संघ आयसीसीकडे सादर करेल. यानंतर १२ फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही परवानगीशिवाय संघात बदल करण्याचा अधिकार बोर्डाला असेल. यादरम्यान बुमराहवर लक्ष ठेवले जाईल.
बीसीसीआयच्या सूत्राच्या माहितीनुसार, बुमराह मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. सूत्राने सांगितले की, “तो (बुमराह) त्याच्या पुनर्वसनासाठी एनसीएकडे जाणार आहे. प्राथमिक अहवालानुसार त्याला फ्रॅक्चर नसून पाठीवर सूज आहे. त्यामुळे एनसीए त्याच्या बरे होण्यावर लक्ष ठेवेल आणि तो तिथेच राहील. तीन आठवड्यांनंतरही, त्याला एक किंवा दोन सामने खेळावे लागतील. भले ही मग ते सामने त्याच्या सामन्यातील फिटनेस तपासण्यासाठीचे सराव सामनेही असू शकतात.’
टीम इंडिया २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. यानंतर त्यांचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध २३ फेब्रुवारीला होईल. यानंतर एक मोठा ब्रेक आहे. भारत ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना २ मार्चला न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर ४ आणि ५ मार्चला उपांत्य फेरीचे सामने आणि ९ मार्चला जेतेपदाचा सामना खेळवला जाणार आहे. अंतिम फेरीचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही, तर एक उपांत्य फेरी दुबईत आणि एक पाकिस्तानमध्ये खेळली जाईल.
