नितीन गडकरींनी उघडली सरकारची तिजोरी ; सुरक्षित प्रवासासाठी केंद्राचा मोठा निर्णय !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ जानेवारी ।। रस्त्यावर एखादा अपघात झाल्यास इतर वाहनचालक तो अपघात पाहूनही तिथे न थांबता आपल्या मार्गाने निघून जातात. बरेचजण आपला वेळ जाईल म्हणून तिथे थांबून अपघातग्रस्तांची मदत करत नाहीत. तर काहीजण पोलिसांना देखील अपघाताची माहिती देत नाहीत. पोलीस आपल्याकडे चौकशी करत बसतील, त्याचा मनःस्ताप सहन करावा लागेल, पोलीस आपल्यालाच या अपघातात अडकवतील या भितीने लोक अपघातग्रस्तांची मदत करणं टाळतात. लोकांची ही सवय बदलण्यासाठी आणि त्यांना माणुसकी दाखवत अपघातग्रस्तांची मदत करायला प्रवृत्त करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोणीही अपघातग्रस्तांची मदत केली तर केंद्र सरकार त्यांना आता २५ हजार रुपये बक्षीस म्हणून देणार आहे. देशात सुरक्षित प्रवासाला चालना मिळावी आणि अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळून त्यांचे प्राण वाचवता यावेत यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात नेणाऱ्या लोकांसाठी सरकार बक्षिसाची रक्कम २५,००० रुपये करणार आहे. सध्या ही रक्कम पाच हजार रुपये इतकी आहे. म्हणजेच बक्षिसाची रक्कम पाच पटींनी वाढवली जाणार आहे”.

नितीन गडकरी काय म्हणाले?
रस्ते सुरक्षेबाबत बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांच्याबरोबर एका टीव्हीवरील कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, “मी रस्ते वाहतूक मंत्रालयाला बक्षिसाची रक्कम वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. आत्ता देखील अशा प्रकारचं बक्षीस दिलं जात आहे. परंतु, त्या बक्षिसाची रक्कम खूप कमी आहे.अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तीला ५,००० रुपये बक्षीस म्हणून दिले जातात. मात्र मी बक्षिसाची रक्कम वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. रस्त्यावर कोणीही एखादा अपघात पाहिला तर एका तासाच्या आत अपघातग्रस्ताला रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तीला हे बक्षीस दिलं जाईल.

लोक अपघातग्रस्तांची मदत का करत नाहीत?
बऱ्याचदा हिट अँड रन प्रकरणांमध्ये पोलिसांना साक्षीदार सापडत नाहीत. अशा स्थितीत ज्या व्यक्तीने पोलिसांना या अपघाताची माहिती दिलेली असते त्या व्यक्तीलाच साक्षीदार बनवण्याचा प्रयत्न केला जातो. रस्ते अपघातामधील पीडितांना मदत करणारे पोलिसांच्या कायदेशीर कार्यवाहीचा भाग बनतात. त्यात त्यांचा खूप वेळ जातो, तसेच त्यांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे अनेकजण पोलिसांना अपघातांची माहिती देणं टाळतात. काही घटनांमध्ये अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्या व्यक्तीला या अपघात प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन साक्षीदार बनवण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *