त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जानेवारी ।। विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपली छाप सोडणारे बरेच स्टार खेळाडू लवकरच इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतही आपला ठसा उमटवताना दिसणार आहेत. मात्र, एक खेळाडू असा आहे ज्याने या स्पर्धेत सलग चार शतकांसह एकूण ५ शतके ठोकली आहेत, तरीही त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळाली नाही. तो खेळाडू करुण नायर आहे. टी-२० संघात संधी मिळाली नसली, तरी तो लवकरच जाहीर होणाऱ्या वनडे संघातील स्थान प्रमुख दावेदार ठरला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये सातत्याने विक्रमी कामगिरी केल्यानंतर नायरने बीसीसीआय आणि टीम इंडियाचे दरवाजे पुन्हा एकदा ठोठावले आहेत.

करुण आठ वर्षांनंतर टीम इंडियात परतणार का?
करुण नायर टीम इंडियाकडून खेळला आहे. त्याला बराच काळ लोटला असला तरी. तो शेवटचा २०१७ मध्ये टीम इंडियाकडून खेळताना दिसला होता. मात्र, आता त्याने विजय हजारे ट्रॉफी कामगिरीतील कामगिरीच्या जोरावर भारतीय वनडे आणि कसोटी संघासाठी स्थान मिळवण्यासाठी दावा मजबूत केला आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच टीम इंडिया कसोटी क्रिकेटमध्ये बदलाच्या टप्प्यातून जात असताना, संघाला करुण नायरसारख्या फलंदाजाची गरज आहे. टीम इंडियाची नुकतीच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धची कामगिरी अत्यंत लाजिरवाणी होती.

या दोन्ही मालिकेत संघाच्या फलंदाजीत सखोलता असूनही फलंदाज फ्लॉप ठरले. रोहित आणि विराटसारख्या दिग्गजांनाही धावा करता आल्या नाहीत. अशा वेळी देशांतर्गत क्रिकेटमध्ये शतकांमागून शतक झळकावणारा करुण टीम इंडियासाठी दिलासा देऊ शकतो. मात्र, त्याच्या नशिबाला निवडकर्त्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. नायर टीम इंडियात परतण्यासाठी उत्सुक आहे. डिसेंबर २०२२ मध्ये, त्याने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘प्रिय क्रिकेट, मला आणखी एक संधी द्या’.

करुण नायरची विजय हजारे ट्रॉफीमधील कामगिरी –
विजय हजारे ट्रॉफीमध्ये करुण नायरने आपल्या बॅटने धुमाकूळ घातला आहे. वनडे फॉरमॅटमध्ये खेळल्या जाणाऱ्या या देशांतर्गत स्पर्धेत करुणने काल (१२ जानेवारी) आणखी एक शतक (१२२ धावा) झळकावले. या मोसमात आतापर्यंत त्याने सलग ४ शतकांसह एकूण ५ शतके झळकावली आहेत. तत्पूर्वी, त्याने ३ जानेवारीला यूपीविरुद्ध ११२, ३१ डिसेंबरला तामिळनाडूविरुद्ध नाबाद १६३, २८ डिसेंबरला छत्तीसगडविरुद्ध नाबाद ४४ आणि २३ डिसेंबरला जम्मू-काश्मीरविरुद्ध नाबाद ११२ धावा केल्या होत्या.

इंग्लंडविरुद्ध झळकावले होते त्रिशतक –
करुण नायरने कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी केली आहे जी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या महान खेळाडूंनाही करता आलेली नाही. नायरने आपल्या कारकिर्दीत ६ कसोटी खेळल्या आहेत. २०१७ मध्ये तो टीम इंडियासाठी शेवटचा मैदानात उतरला होता. करुण इंग्लंडविरुद्ध त्रिशतक झळकावून प्रसिद्धीझोतात आला होता. त्याने २०१६ मध्ये चेन्नई येथे झालेल्या कसोटीत हा पराक्रम केला होता. करुणने ३८१ चेंडूत नाबाद ३०२ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये ३२ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *