महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जानेवारी ।। देशातील हजारो लोक दररोज बाईक, स्कूटीने प्रवास करतात. बाईकस्वारांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. बाईकवरुन प्रवास करताना सुरक्षा म्हणून हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला जातो. काहीजण नियमितपणे हेल्मेट वापरतात. तर काहीजण हेल्मेट वापरायला टाळाटाळ करतात. हेल्मेटचा वापर न करणाऱ्यांनी हेल्मेटचा वापर करावा यासाठी सरकार नेहमी प्रयत्नशील असते. या संदर्भात उत्तरप्रदेश सरकारने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक होत आहे.
उत्तरप्रदेशमध्ये हेल्मेटसंबंधित नवा कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याअंतर्गत बाईकस्वारांना बिना-हेल्मेट पेट्रोल मिळणार नाही. अपघात आणि त्यातील मृतांची संख्या कमी व्हावी या उद्देशाने हा नियम यूपी सरकारने केला आहे. उत्तर प्रदेश राज्याचे परिवहन मंडळाकडून नव्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे.
यूपी वाहतुक विभागाचे आयुक्त ब्रजेश नारायण सिंह यांनी ८ जानेवारी रोजी हा दुचाकीसंबंधित कायदा लागू करण्याचे आदेश दिले आहेत. या कायद्यामुळे हेल्मेट नसलेल्या बाईकस्वारांना पेट्रोल पंपावर पेट्रोल दिले जाणार नाही. या कायद्यामुळे लोक हेल्मेट वापर करायला सुरुवात करतील असा सरकारचा मानस आहे.
फक्त उत्तरप्रदेशच नाही, तर भारताच्या अन्य राज्यांमध्येही हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही, असा कायदा आहे. २०१५ मध्ये मध्यप्रदेश सरकारने हा कायदा राज्यात लागू केला होता. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही हा नियम दुचाकीस्वारांसाठी लागू करण्यात आला आहे. याशिवाय तामिळनाडू, कर्नाटक, झारखंड, राजस्थान या राज्यांमध्येही असा नियम आहे.