महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जानेवारी ।। महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या जेजुरी गडावरील खंडोबा मंदिरात शाकंभरी पौर्णिमा उत्सवानिमित्त फळभाज्या व पालेभाज्यांची आरास करण्यात आली. श्रीक्षेत्र जेजुरी येथील गडवर श्री खंडोबासोबत म्हाळसाई आणि बाणाई असल्याने या मंदिरामध्ये पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीपासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी उत्सव साजरा केला जातो.
यंदाही या उत्सवानिमित्त मंदिराच्या गाभार्यात फळभाज्या आणि पालेभाज्यांची आरास करण्यात आली. या उत्सवासाठी 300 किलो पालेभाज्या, फळभाजा व शेंगवर्गीय भाज्या वापरण्यात आल्या. ही आरास नित्य वारकरी, पुजारी, कर्मचारी सेवकरी यांनी केली.
पौराणिक कथेनुसार पृथ्वीवर प्रलय आल्यानंतर सर्वत्र अन्नधान्याची टंचाई होती. त्रैलोकातील दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली. मग शाकंभरी देवीने भाजी आणि वृक्षवेलींच्या रूपाने विश्वाचे पालन-पोषण केले.
विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले. त्यामुळे शाकंभरी उत्सवाच्या काळात हिरव्या पालेभाजा फळभाजा आणि शेंगवर्गीय भाजांची पूजा केली जाते आणि त्याचा प्रसाद भाविकांमध्ये वाटला जातो.