Shaktipith Mahamarg | शक्तिपीठ महामार्ग नेमका कोणत्या भागातून जाणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जानेवारी ।। शक्तिपीठ महामार्ग सांगलीपर्यंतच होईल, कोल्हापूर जिल्ह्याचा त्यात समावेश नसेल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केल्यामुळे शक्तिपीठ नेमका कोणत्या भागातून जाणार, याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी रेखांकन (मार्किंग) केलेला महामार्ग कायम राहणार की आता तो बदलणार, याची सर्व संबंधितांमध्ये उत्सुकता आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गाचे काम पुन्हा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विरोध असलेला भाग वगळून इतर भागातून हा महामार्ग करण्याचे नियोजन आहे. नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्ग करण्यासंदर्भात दोन वर्षांपासून हालचाली सुरू आहेत. बहुतेक शेतकर्‍यांचा विरोध असतानाही सर्वेक्षण करून मार्ग निश्चित करण्यात आला. पर्यावरण विभागाकडून ना हरकत पत्रही घेण्यात आले.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीवेळी शक्तिपीठसाठी सक्ती न करता तो रद्द करण्याबाबत आश्वासन दिलेे. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येताच महामार्गासाठीच्या हालचाली पुन्हा गतिमान झाल्या. यासंदर्भात मुंबईत बैठक होऊन विरोध असलेल्या भागातून मार्ग बदलून घेण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोध असलेल्यांना विश्वासात घेऊन काम तत्परतेने सुरू करण्यास सांगितले आहे. दरम्यान, शक्तिपीठ बाधीत शेती बचाव समितीने शक्तिपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे, अशी भूमिका कायम ठेवली आहे. याबाबत महाराष्ट्र किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख म्हणाले, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने पर्यावरण खात्याकडे शक्तिपीठ महामार्गाबाबत परवानगीसाठी अर्ज दाखल केला आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग होणार आहे. फक्त कोणत्या शेतकर्‍यांच्या घरावरून नांगर फिरवायचा हे जाहीर व्हायचे राहिले आहे.

ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्गच रद्द झाला पाहिजे यासाठी अनेक दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. पण महाराष्ट्र सरकार शेतकर्‍यांचा विचार करायला तयार नाही. सरकार रेखांकन बदलून महामार्ग करायच्या तयारीत आहे. ज्या भागातून हा महामार्ग जाणार आहे, तेथील शेतकर्‍यांना मोबदला कसा देणार, याबाबत सरकार किंवा मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत. आम्ही शेतकर्‍यांच्या बाजूने ठाम उभे राहून शक्तिपीठ महामार्गाला टोकाचा विरोध करू.

‘या’ गावांतून रेखांकन केलेला मार्ग बदलणार?
सोलापूर जिल्ह्यातून खानापूर (जि. सांगली) तालुक्यातील बाणूरगडमध्ये महामार्गाचा प्रवेश होईल. तेथून कवठेमहांकाळ तालुक्यात तिसंगी; तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, मणेराजुरी, मतकुणकीतून; मिरज तालुक्यातील कवलापूर, बुधगाव, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी अशा गावांमधून तो जाणार असल्याने या ठिकाणी रेखांकन (मार्किंग) केले आहे. आता यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *