Walmik Karad: 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं ; विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जानेवारी ।। आवादा कंपनीकडून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल असणारा आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराड याला मंगळवारी केज सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. वाल्मिक कराड याने 31 डिसेंबरला पुण्यात सीआयडीच्या कार्यालयात जाऊन आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर त्याला केजमध्ये आणण्यात आले होते. याठिकाणी सत्र न्यायालयाने वाल्मिक कराड याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. वाल्मिक कराडची 14 दिवसाची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्यामुळे आज कराड याला दुपारी केज येथील न्यायालयात हजर केले जाईल. गेले चौदा दिवस झाले कराड याला बीड येथील शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते.

न्यायालयात नेण्यापूर्वी बीड शहर पोलीस ठाण्यात डॉक्टरांना बोलावून वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या गाडीत बसून वाल्मिक कराड केज न्यायालयाच्या दिशेने रवाना झाला. वाल्मिक कराड याला तब्बल 13 दिवसांनी पोलीस कोठडीतून बाहेर आणण्यात आले. त्यावेळी वाल्मिक कराड याचा लूक बदललेला दिसला. 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्याने वाल्मिक कराडची दाढी वाढलेली आहे. त्याच्या डोक्यावरचे केसही बरेच विस्कटलेले दिसत होते. एरवी टापटीप राहणाऱ्या वाल्मिक कराडचा हा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यावर सध्या फक्त खंडणीचा गुन्हा दाखल असला तरी वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुनच संतोष देशमुख यांना ठार मारण्यात आल्याचा आरोप होत आहे. वाल्मिक कराड याच्या वकिलांकडून आज न्यायालयीन कोठडीसाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. यावेळी न्यायालयात काय युक्तिवाद होणार, हे पाहावे लागेल. तसेच न्यायालय वाल्मिक कराडला न्यायालयीन की पोलीस कोठडी सुनावणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

वाल्मिक कराडच्या आईकडून ठिय्या आंदोलन
वाल्मिक कराड याला आज केज न्यायालयात हजर केले जात असताना त्याच्या आईकडून परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या सगळ्यामुळे आता बीड जिल्ह्यात काय पडसाद उमटणार, हे पाहावे लागेल. वाल्मिक कराड हा राज्याचे नागरी व अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटचा सहकारी आहे. त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडे यांचीही कोंडी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *