महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जानेवारी ।। वाल्मिक कराडला आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज कराडला केज कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि मकोका देखील लावण्यात आला. त्याच्यावर मकोका लावण्यात आल्यानंतर त्याच्या समर्थकांनी परळीत आक्रमक भूमिका घेतली आहे. टायर जाळत समर्थकांनी रोष व्यक्त केला. वाल्मिक कराडसाठी त्याची आई देखील मैदानात उतरली. वाल्मिक कराडच्या आईने परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या केला. मात्र, काही वेळानंतर वाल्मिकच्या आईला चक्कर आल्याचही पाहायला मिळालं. तर वाल्मिकच्या बायकोनेही गंभीर आरोप केले आहेत.
संतोष देशमुख प्रकरणाने बीड धुमसत आहे. संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर मकोका देखील लावण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत वातावरण तापलं आहे. परळीत अचानक बंदची हाक देण्यात आली आहे. काही भागात बसवर दगडफेक देखील करण्यात आली. यामुळे तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. परळीत काही ठिकाणी कराडच्या समर्थकांनी आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांच्या पोस्टरवरही चप्पल मारत रोष व्यक्त केला.तर काही समर्थकांनी टायर पेटवल्यानंतर पोलिसांनी टायर विझविले.