मकोका लावला म्हणजे नेमकं काय? तो कधी लागू केला जातो? शिक्षेची तरतूद काय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जानेवारी ।। बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. संतोष देशमुख यांचा 9 डिसेंबर रोजी खून झाला होता. या प्रकरणात आत्तापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. तर एक जण फरार आहे. आज मुख्य आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसंच, वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आला आहे. या आधी हत्या प्रकरणातील 8 आरोपींना मोक्का लावण्यात आला होता. पण मोक्का म्हणजे काय? मोक्का कायदा कधी लागू होतो? हे जाणून घेऊ या.

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात यापूर्वी दर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, सुधीर घुले, प्रतिक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना मकोका लावण्यात आला होता. वाल्मिक कराड हा हत्ये प्रकरणाशीसंबंधित खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत आहे. आज कराडवर मकोका लावण्यात आला आहे. हत्येचा कट रचल्याने त्याच्याविरोधात मकोकाअंतर्गंत कारवाई करावी, अशी एसआयटीची मागणी आहे.

मकोका कायदा म्हणजे काय?
महाराष्ट्र सरकारने संघटित गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी 1999 मध्ये मकोका कायदा लागू करण्यात आला. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (Maharashtra Control of Organised Crime Act) असं याचं नाव आहे.

खंडणी, अपहर, हप्ते वसुली, सुपारी देणे, तस्करी यासारखे गुन्हे संघटितरित्या केल्यास आरोपींवर मकोका लागतो.

मकोका लावण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त आरोपींची टोळी आवश्यक असते. आरोपींवर दहा वर्षांमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्यास मोक्का लागतो. विशेष म्हणजे गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल असावं लागतं.

मकोका कायदा लागल्यानंतर आरोपींना जामीन मिळत नाही. आरोपींना पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे. 5 वर्ष ते जन्मठेप अशी शिक्षा कायद्यात आहे.

मोक्का कायद्यांतर्गंत पाच लाखांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. आरोपीवर मालमत्ता जप्तीची कारवाई होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *