महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जानेवारी ।। इंधनाचे वाढलेले दर, पर्यावरणाबाबत निर्माण झालेली जागरूकता आणि वाहन वापरात होणाऱ्या खर्चात बचत होत असल्याने इलेक्ट्रिक वाहनांकडे पुणेकरांचा ओढा वाढला आहे. गेल्या वर्षात पुण्यात तब्बल ९२ हजार ४०२ ‘ईव्हीं’ची विक्री झाली. २०२३ च्या तुलनेत सुमारे ६० हजारांनी ही संख्या जास्त आहे. सध्या पुण्यात सुमारे तीन लाख इलेक्ट्रिक वाहने धावत आहेत.
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंद असलेल्या सर्वच वाहनांची संख्या आता सुमारे ४० लाख झाली आहे. त्या तुलनेत ईव्हीची संख्या कमी वाटत असली तरीही वाढीचा वेग अधिक आहे. २०२१ मध्ये पुण्यात आठ हजार ६६८ वाहनांची नोंद झाली, तर २०२४ मध्ये ९२ हजार ४०२ वाहनांची नोंद झाली.
यावरून ‘ईव्ही’ला पुणेकरांचा प्रतिसाद वाढता असल्याचे दिसत आहे. त्या तुलनेत चार्जिंग स्टेशनची संख्या देखील वाढत आहे. दरम्यान ‘ईव्ही’च्या विक्रीत दुचाकींना सर्वाधिक मागणी आहे. त्यानंतर चारचाकींना मागणी आहे. बस, रिक्षाला तुलनेने कमी मागणी आहे.
सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवर मोटार वाहन कर संपूर्ण माफ केला आहे. त्यामुळे वाहनाची किंमत कमी होते. शिवाय उत्पादनदेखील वाढले आहे. परिणामी वाहन विक्रीत वाढ होत आहे.
– स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामुळे इंधनासह पैशांचीही बचत होते, तसेच प्रदूषणाला आळा बसतो. त्यामुळे ‘ईव्ही’चा वापर करणे गरजेचे आहे.
– पूर्वा परमार, विद्यार्थिनी
काय आहेत कारणे?
1) ‘ईव्ही’चे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये वाढ
2) ‘ईव्ही’च्या दुचाकी व चारचाकींच्या विविध पर्यायांत वाढ
3) इंधनखर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत
4) चार्जिंग स्टेशनची उपलब्धता वाढली
5) पर्यावरणपूरक वाहने