महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जानेवारी ।। पहिली ते आठवीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची कवाडे उघडणार्या आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यास अखेर मंगळवारी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी 2 हजार 181 विद्यार्थ्यांचे अर्ज भरले गेले आहेत. त्यामुळे राज्यभरात आरटीई प्रवेश प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध केली जाते आणि संबंधित विद्यार्थ्यांचे शुल्क सरकारमार्फत शाळांना शुल्क प्रतिपूर्तीच्या माध्यमातून देण्यात येते. त्यानुसार यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना आपल्या मुलांचे अर्ज मंगळवार दि. 14 ते 27 जानेवारीदरम्यान भरता येणार आहेत.
सध्या आरटीई पोर्टलवर दिसून येत असलेल्या आकडेवारीनुसार 8 हजार 858 शाळांची नोंद झाली असून, 1 लाख 9 हजार 39 जागा उपलब्ध झाल्या आहेत. आरटीई प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी सर्वाधिक जागा पुण्यात उपलब्ध असतात. यंदा देखील प्रवेशासाठी 960 शाळांची नोंदणी झाली असून, 18 हजार 530 जागा उपलब्ध झाल्या आहेत.
अर्ज भरण्यात पुणे आघाडीवर
आरटीई प्रवेशाचे अर्ज भरण्यात पुणे जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. पहिल्याच दिवशी पुणे जिल्ह्यात 654 विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यात आले आहेत. त्यानंतर ठाणे (181), नागपूर (163), मुंबई (140) आदी शहरांमध्ये पहिल्याच दिवशी अर्जांची शंभरी पार झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अर्ज भरण्यासाठी 13 दिवसांचाच कालावधी असल्यामुळे पालकांनी त्यांच्या मुलांचे अर्ज तातडीने भरणे गरजेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
असा भरा ऑनलाइन अर्ज
शाळेची यादी माहिती झाल्यानंतर पालकांना आपल्या मुलांचे अर्ज भरण्यासाठी rte25admission.maharashtra.gov.in वर जावे लागेल. आरटीई 25 टक्के आरक्षणाच्या खाली शाळेच्या यादीवर क्लिक करा. आता तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडा. त्यानंतर ब्लॉकमधील शाळेच्या यादीवर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर शाळेची यादी व प्रवेश अर्ज तुमच्या कॉम्प्युटर स्क्रिनवर दिसू लागेल. अर्जामध्ये मुलाचे संपूर्ण नाव, ठिकाणाचे नाव, लिंग व अन्य माहिती अचूक भरावी. अर्ज भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज सबमिट करणे गरजेचे आहे.