पुण्यात 10 किलोमीटरसाठी 25 मिनिटांचा वेळ, पोलिसांचा दावा : उपाययोजनांमुळे वाहतूक नियमन सुधारले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जानेवारी ।। वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या समन्वयातून शहरातील प्रमुख रस्त्यांवर उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे कोंडीच्या समस्येत सुधारणा होत आहे. पुण्यात 10 किलोमीटरच्या प्रवासासाठी 25 मिनिटांचा वेळ लागत आहे, असा दावा वाहतूक पोलिसांनी केला आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षांत वाहनसंख्या 72 लाख इतकी झाली आहे. पाच वर्षांत सुमारे 20 लाख वाहने वाढली असून, रस्त्यांची वहन क्षमता तेवढीच आहे. मात्र, तरीही वाहतूक पोलीस चांगले काम करीत आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, पोलीस निरीक्षक (नियोजन) सुनील गवळी उपस्थित होते.

‘टॉमटॉम’च्या 2024 च्या अहवालात पुणे शहर वाहतूककोंडीत जगात चौथ्या, तर देशात तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र, पुण्यात सध्या मेट्रो, उड्डाणपुलासह इतर विकासकामे सुरू आहेत. वाहतूककोंडी दूर करण्यासाठी सप्टेंबरपासून महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या समन्वयातून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. शहरातील 80 टक्के वाहतूक ही प्रमुख 32 रस्त्यांवरून होते. संबंधित प्रमुख रस्त्यांवर सुधारणा करण्याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महापालिका प्रशासनाला पत्र लिहिले होते. त्यानुसार त्या प्रमुख रस्त्यांवर वाहतूककोंडी दूर करण्यासह सुरक्षिततेच्या दृष्टीने कामे केली जात आहेत.

खराब रस्ते, खड्ड्यांची दुरुस्ती, अतिक्रमण आणि नो-पार्किंगमधील वाहनांवर कारवाई केली जात आहे. पहिल्या टप्प्यात ‘मिशन-15’ मोहिमेत 15 रस्त्यांची कामे सुरू केली आहेत. त्यात सोलापूर रस्त्यावर चांगला परिणाम दिसून येत आहे. लवकरच नगर रस्त्यासह इतर रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

दरम्यान, ‘टॉमटॉम’ च्या अहवालानुसार, 10 किलोमीटर जाण्यासाठी बंगळूरमध्ये पूर्वीच्या तुलनेत 50 सेकंदांनी, तर कोलकता शहरात 10 सेकंदांनी वाढ झाली आहे. परंतु, पुण्यात गतवर्षीच्या तुलनेत त्यात एक मिनिटाने घट झाली आहे. महापालिका आणि वाहतूक शाखेच्या प्रयत्नांतून पुढील वर्षभरात वाहतूककोंडी आणखी कमी होईल, असेही पाटील यांनी सांगितले.

वाहतूक पोलिसांची कामगिरी

■ पुण्यात 10 किलो मीटरसाठी लागणारा वेळ 35 मिनिटांवरून 25 मिनिटांवर सोलापूर रस्ता, फातिमानगर, श्रीमान चौक, कौन्सिल हॉल चौक, किराड चौकात कामांमुळे सुधारणा पीएमपीची 54 बसस्थानके चौकांमध्येच, उपाययोजनेची गरज.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *