महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जानेवारी ।। भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर विश्रांतीवर आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या अंतिम सामन्यादरम्यान त्याला पाठीचे दुखणे अद्भवले होते. त्यामुळे तो अंतिम साम्यातील दुसऱ्या डावात गोलंदाजीसाठी आला नव्हता. त्यानंतर आता बुमराहच्या दुखापतीबाबत अपडेट समोर आली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला डॉक्टरांनी बेड रेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे. या दुखापतीतून सावरण्यावर त्याचा संघातील पुढील सहभाग अवलंबून असेल. त्यामुळे आता बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळेल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सुत्रांद्वारे असे समजत आहे की, बुमराहला बंगळुरूमधील भारतीय क्रिकेट नियामक मंडळच्या (BCCI) सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) ला दुखापतीबाबत अहवाल द्यावा लागणार आहे, परंतु अद्याप त्याची चेक-इन तारीख निश्चित झालेली नाही.
“बुमराह पुढच्या आठवड्यात CoE कडे जाऊ शकतो, परंतु अजून तारीख निश्चित झालेली नाही. पाठीचे स्नायू बरे होण्यासाठी आणि सूज कमी होण्यासाठी त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. पाठीची सूज कमी झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. “, सुत्राद्वारे समजले.
एकीकडे बुमराह दुखापतग्रस्त आहे, तर दुसरीकडे आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय वन-डे संघ जाहीर करण्यात विलंब होत आहे. एका वृत्तानुसार जसप्रीत बुमराहची दुखापत हे देखील भारतीय संघ जाहीर करण्याला विलंब होण्यामागचे कारण सांगितले जात आहे. कारण जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत अजून ठोस अहवाल समोर आलेला नाही.
त्याचबरोबर फिरकीपटू कुलदीप यादव देखील मागच्या काही काळापासून दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे. पण इंग्लंडविरूद्धची वन-डे मालिका खेळण्यासाठी कुलदीप यादव तंदुरूस्त होईल असे समजत आहे. परंतु बुमराहच्या उपलब्धतेबद्दल अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. वृत्तानुसार, बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सुरूवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.