![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जानेवारी ।। जमिनीसंबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं आवश्यक असतं. म्हणजे ती जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते. ही माहिती सातबारा, फेरफार, खाते उतारे यांच्या स्वरुपात तहसिल आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहे.
आता हीच माहिती सरकारनं ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. याआधी ही सुविधा फक्त 7 जिल्ह्यांपुरती मर्यादित होती. आता मात्र राज्यभरातल्या 19 जिल्ह्यांमध्ये ही सुविधा पुरवली जात आहे. यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, लातूर, मुंबई उपनगर, नंदूरबार, नाशिक, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.
जुने अभिलेख कसे पाहायचे?
जुने अभिलेख काढण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला aapleabhilekh.mahabhumi.gov.in असं सर्च करावं लागेल.
आता आपण सुरुवातीला फेरफार उतारा कसा पाहायचा ते बघूया.
यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे.
पुढे तालुका, गावाचं नाव आणि अभिलेख प्रकार निवडायचा आहे. यात तुम्हाला कोणता उतारा हवा आहे तो निवडायचा आहे.
आता मी फेरफार उतारा निवडला आहे. जर तुम्हाला सातबारा हवा असेल तर सातबारा, आठ-अ हवा असेल तर आठ-अ पर्याय निवडायचा आहे. असे जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार यात उपलब्ध आहेत.
त्यानंतर गट क्रमांक टाकून शोध या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर शोध निकाल या पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराची माहिती दिसते.
फेरफाराचं वर्षं आणि क्रमांक तिथं दिलेला असतो. तुम्ही त्यावर क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पाहू शकता.
उदाहरणार्थ समजा मला 1982मधील फेरफार पाहायचा आहे म्हणून मी त्यासमोरील कार्टमध्ये ठेवा या पर्यायावर क्लिक केलं आहे.
त्यानंतर तुम्हाला पुनरावलोकन कार्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुमचं कार्ट तुमच्यासमोर ओपन होईल. त्याखाली असलेल्या पुढे जा या पर्यायावर क्लिक केलं की डाऊनलोड सारांश नावाचं एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल, इथं तुमच्या फाईलची सद्यस्थिती उपलब्ध आहे अशी दिली आहे. त्यासमोरील फाईल पहा या पर्यायावर क्लिक केलं की तुमच्यासमोर 1982चं फेरफार पत्रक ओपन होईल.
या पत्रकावरील खाली बाण असलेल्या चिन्हावर तुम्ही क्लिक केलं की ते डाऊनलोड होईल.
त्यानंतर 1982 सालचा फेरफार उतारा पाहू शकता. यात जमिनीच्या अधिकार अभिलेखात काय बदल झाले, ते कधी झाले याची माहिती दिलेली असते.
याचपद्धतीनं तुम्ही सातबारा असा अभिलेखाचा प्रकार निवडला आणि आधी सांगितल्याप्रमाणे प्रकिया केली तर जुना सातबारा उताराही इथं पाहू शकता.
