राज ठाकरेंचं कौतुक करत मोदी महायुतीच्या आमदारांना म्हणाले, ‘दुस-या राज्यात किंवा…’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ जानेवारी ।। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी एक दिवसीय दौऱ्यादरम्यान महायुतीच्या आमदारांशी संवाद साधला. या बैठकीमध्ये मोदींनी आमदारांना काही महत्त्वाचे सल्ले दिले. याच वेळेस बोलताना मोदींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा उल्लेख करत त्यांचं कौतुक महायुतीच्या आमदारांसमोर केलं. नेमकं मोदींनी राज ठाकरेंबद्दल कशासंदर्भात आणि काय म्हटलं जाणून घेऊयात…

मोदी काय म्हणाले?
लोकप्रतिनिधींनी नेमकं कसं काम करायला हवं? या संदर्भात मार्गदर्शक मोदींनी बैठकीत केलं. राजकीय जीवनातील आपले काही अनुभव सुद्धा मोदींनी आमदारांसमोर मांडले. सामान्यातल्या सामान्य माणसाचं काम लोकप्रतिनिधी केलं पाहिजे, सामान्य कार्यकर्ता म्हणून आपण जनसामान्यात वावरुन त्यांची काम केली पाहिजेत, असंही मोदी म्हणाले. सरकारमध्ये महायुतीतील पक्षांनी एकमेकांमध्ये समन्वय पाळला पाहिजे, अशी अपेक्षा पंतप्रधांनी व्यक्त केली. केंद्र आणि राज्य सरकारच्या सरकारी योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा त्यांचा लाभ त्यांना द्या, या काही सूचना सुद्धा मोदींनी आमदारांशी बोलताना केल्या.

मोदींनी आमदारांना काय सल्ला दिला?
पंतप्रधान मोदींनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच प्रत्यक्षपणे आमदारांशी संवाद साधताना त्यांना, “जनतेपर्यंत पोहोचा, जनसंपर्क वाढवा” असा सल्ला दिला. तसेच महायुतीमधील आमदारांना सल्ला देताना मोदींनी, “एकमेकांविषयी द्वेषभाव ठेवू नका. महायुती म्हणून काम करतांना समन्वय ठेवा,” असं आवाहन केलं. तसेच पुढे बोलताना, “लोकप्रतिनीधींनी आरोग्याकडेही लक्ष द्यायला हवं. नियमीत योगासने करा. कुटुंबाकडे लक्ष द्या. घरातील पत्नी- मुलेमुली यांकडेही लक्ष द्या,” असंही पंतप्रधान म्हणाले.

100% मतदान कसं होईल यासाठी…
त्याचप्रमाणे मोदींनी सर्व आमदारांना, जास्तीत जास्त धार्मिक कार्यक्रम घेण्याचा सल्ला दिला. तसेच, “अधिकाधिक वेळ जनतेत घालवा. जनतेशी सातत्याने संपर्कात राहा. ज्या व्यक्तींनी, घटकांनी मतदान केले नाही त्यांना देखील प्राधान्याने महत्त्व द्या. त्यांची ही काम प्राधान्याने करा. 100% मतदान कसं होईल यासाठी अधिकाधिक लोकोपयोगी कामे करा,” असंही मोदींनी आमदारांना सांगितलं. “विरोधकांशी द्वेषपूर्ण वागणूक टाळा,” असंही पंतप्रधान म्हणाले.

राज ठाकरेंचं कौतुक
महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन करताना मोदींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केला. “दुस-या राज्यात किंवा मतदारसंघात एखादी गोष्ट चांगली असेल तर त्याबाबत अभ्यासदौरा करा,” असा सल्ला पंतप्रधान मोदींनी भाषणादरम्यान महायुतीच्या आमदारांना दिला. यावेळी मोदींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुजरात दौ-यावर आले होते त्याचं उदाहरण उपस्थित आमदारांना देत राज ठाकरेंचं कौतुक केलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *