महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ जानेवारी ।। पुणे पोलिसांनी सायबर फ्रॉड करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केलाय. नेपाळच्या २ आरोपींसह तामिळनाडूमधील १ अशा एकूण ३ आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यात एका व्यक्तीची तब्बल ६८ लाख ११ हजार ६९२ रूपयांची फसवणूक केलीय. पोलिसांनी केलेल्या तपासात ही टोळी आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांसाठी काम करत असल्याचं निष्पन्न झालंय. तर आतापर्यंत या टोळीने ५० अकाऊंटवरून १३ कोटींची उलाढाल केल्याची माहिती पोलिसांना मिळालीय.
पुण्यात सायबर फ्रॉड करणाऱ्या टोळीचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. पुण्यात एका व्यक्तीला तब्बल ६८ लाख ११ हजार ६९२ रूपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तपासाला सुरूवात केली. पोलीस तपासात एकूण ३ आरोपींना पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. तामिळनाडूमधील १ तर, नेपाळच्या २ अशा ३ आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
लाचीन शेर्पा (नेपाळ),बिन बहादूर प्रधान (नेपाळ), तर रमेश कुमार अभिमन्यू (तमिळनाडू) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही टोळी आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांसाठी काम करत असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन गुंतवणूक आणि त्यातून चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून या टोळीने आत्तापर्यंत शेकडो लोकांना गंडा घातलाय.
या प्रकरणी ३ संशयित आरोपी पुण्यातील एका हॉटेलमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सखोल चौकशी केली असता आरोपींकडून ७ मोबाईल, नेपाळ देशातील नागरिकत्वचे कार्ड, विविध बँकांचे पासबुक, चेकबुक, यासह बनावट पासपोर्ट देखील जप्त करण्यात आलंय. याआधी या आरोपींनी मुंबई पुण्यासह बेंगलोरमध्येही अनेकांची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालंय.