महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ जानेवारी ।। महायुती सरकारच्या पालकमंत्र्यांची यादी शनिवारी जाहीर करण्यात आली. पालकमंत्रिपदाच्या यादीतून धनंजय मुंडे यांचे नाव वगळ्यात आले. बीडचे पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आले. धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्याचेच नाही तर इतर दुसऱ्या कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलेल नाही.
त्यामुळे हा धनंजय मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराड खंडणी प्रकरण भोवलं का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशामध्ये पालकमंत्रिपदाबाबत धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे यांनी पालकमंत्रिपदावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘बीडची सध्याची स्थिती पाहून मीच अजितदादांना विनंती केली. बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी. जसा पुण्याचा विकास झाला तसा बीडचाही व्हावा हिच माझी भावना आहे.’ विरोधकांच्या विरोधावर बोलताना धनंजय मंडे म्हणाले, ‘त्यांच्या मागणीपेक्षा माझी भावना काय हे महत्वाचं. मी पक्ष नेतृत्वाला विनंती केली बीडची जबाबदारी आपण घ्यावी.
धनंजय मुंडेंनी आरोप करणाऱ्यांना विनंती करताना सांगितले की, ‘विरोधकांनी माझ्यावरचा एक तरी आरोप खरा करून दाखवावा. मला आता यावर काहीच बोलायचं नाही. वेळ आल्यावर मी बोलायला कमी पडणार नाही. आताची परिस्थीती पाहता बीडमध्ये सामाजिक सलोखा व्यवस्थित व्हायला हवा. मला बदनाम करायचंय तर करा मात्र माझ्या बीड जिल्ह्याच्या मातीला बदनाम करू नका. वाल्मिक कराड याच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप खोटे आहेत.’
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून वगळण्यात आले यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, ‘महायुतीतील काही लोकांना पालकमंत्रिपद मिळाले नाही. धनंजय मुंडे, दादा भुसे यांना का बाजूला ठेवलं माहित नाही. अॅडजस्टमेंटमध्ये काही अडचण आली असेल. एकाच जिल्ह्यात अनेक जण इच्छुक असतात मात्र अॅडजस्टमेंट करावी लागते.’