महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ जानेवारी ।। गेल्या महिन्याभरापासून रखडलेली पालकमंत्रिपदाची यादी अखेर शुक्रवारी जाहीर करण्यात आली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासह गुन्हेगारीमुळे गाजत असलेल्या बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. धनंजड मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला, मात्र बीडचे पालकमंत्रिपद पुन्हा अजित पवार गटाच्याच पारड्यात आले. यावर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अवघ्या तीन शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांना त्यांनी ना शुभेच्छा दिल्या, ना अभिनंदन केले. यामुळे भुजबळांची नाराजी कायम असल्याचे दिसते.
विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अजित पवार गटाचे अधिवेशन होत आहे. शिर्डीत सुरू असलेल्या दोन दिवसीय अधिवेशनाला नाराज छगन भुजबळ यांनीही हजेरी लावली. यावेळीही माध्यमांशी बोलताना त्यांनी अजितदादांचा उल्लेख टाळला होता. त्यानंतर अधिवेशन अर्धवट सोडूनच ते मुंबईकडे रवाना झाले होते. आता पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि विविध विषयांवर भाष्य केले.
पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती. यासह महायुतीतील अनेक नेते नाराज आहेत. यावर विचारले असता भुजबळ यांनी मला याबाबत काहीही माहिती नसल्याचे म्हटले. तसेच बीडच्या पालकमंत्रिपदी अजितदादांच्या नावाची मोहोर उमटली. याबाबत विचारले असता चांगली गोष्ट आहे, या तीन शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली.