महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२३ जानेवारी ।। पिंपरी चिंचवड शहरात बिगारी कामगारांच्या घराला आग लागून भीषण दुर्घटना घडलीय. पत्रा शेडच्या झोपडपट्टीत आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. पिंपळे गुरव परिसरात काशीद पार्कजवळ ही झोपडपट्टी आहे. या आगीच्या घटनेत कामगारांच्या घरात लाखोंची रोकड जळून खाक झाली. याशिवाय सोन्याचे दागिनेही जळून राख झाले. आगीच्या या घटनेनंतर कामगारांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बिगारी कामगारांच्या घराला लागलेल्या आगीत लाखोंची रोकड जळालीय. सकाळी साडे अकरा वाजता ही आगीची घटना घडली. कामगारांच्या घरात रोकड ठेवली होती ती जळून खाक झाली. याचे फोटो आणि व्हिडीओ आता समोर आले आहेत.
झोपडपट्टीला लागलेली आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमन दलाला यश आलंय. मात्र आगीचं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पिंपरी चिंचवडच्या लेबर कॅम्पमध्ये लागलेल्या आगीच्या या घटनेत पाच लाख सत्तर हजार रुपयांची रोकड जळून खाक झालीय. तर साडे चार तोळे सोन्याचे दागिनेही जळून राख झाल्याची माहिती समोर आलीय.
आग लागलेल्या ज्या झोपडीत ही रोकड आणि सोन्याचे दागिने होते ती मुकादम असलेल्या करिअप्पा गुंडापूर याची होती. सेंट्रिंगच्या ठेकेदारांना ती दिली होती अशी माहिती समजते. बाणेरचे विठ्ठल पन्हाळे आणि हिंजवडीचे गजानन गदाडे अशी त्यांची नावे आहेत. या दोन ठेकेदारांकडे इतकी रक्कम कुठून आली याचा तपास पोलीस करत आहेत.