महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२४ जानेवारी ।। कोल्हापूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उदय सामंतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. उदय सामंत वारंवार सांगत आहेत की, काही लोक संपर्कात आहेत. त्यावर शरद पवार म्हणाले, “मी वाट बघतोय कोण कोण कधी जातंय.”
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधताना पवार म्हणाले, “ते दावोसला उद्योग आणण्यासाठी गेले की पक्ष फोडण्यासाठी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ठाकरे गटातील अनेक नेते संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला होता.
उद्धव ठाकरे यांच्या सभेची गर्दी आणि राजकीय संदेश
शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या कालच्या सभेबाबत भाष्य केले. “काल उद्धव ठाकरे यांच्या सभेला मोठी गर्दी होती, हे लक्षात आलं. ते दोन दिवसांपूर्वी माझ्याकडे आले होते आणि स्वबळाबाबत चर्चा केली होती,” असे पवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “उद्धव ठाकरे वाटेल तो त्याग करतील, पण कधीच आपले विचार सोडणार नाहीत. त्यांची टोकाची भूमिका दिसली नाही, मात्र त्यांची पावले पक्ष वाढवण्याच्या दिशेने पडत आहेत.”
अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यातील टीकाटिप्पणी
अमित शहा यांच्या टिकेवर शरद पवार म्हणाले, “अमित शाह खूप टोकाची टीका करतात, त्यामुळे उद्धव ठाकरेही त्यांच्यावर तीव्र टीका करत असतील. अमित शहा यांच्यावर कोल्हापूरचे संस्कार असल्याचं वाटत नाही.”
उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत भाजपच्या हिंदुत्वाच्या धोरणावर टोकाची टीका केली होती. ते म्हणाले होते की, “भाजपचे हिंदुत्व खरे नाही.” या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर-
कालच्या कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवार हे एकाच मंचावर होते. याबाबत शरद पवार म्हणाले, “त्या कार्यक्रमात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. अजित पवार यांची खुर्ची बदलली कारण नवीन सहकार मंत्री होते, त्यांना माझ्याशी बोलायचं होतं. मीच म्हटलं की, मग माझ्या बाजूला बसा.”