मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर तीन तासांचा ब्लॉक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ जानेवारी ।। मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर अर्थात मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वर आजपासून म्हणजेच सोमवार २७ जानेवारी २०२५ पासून सलग तीन दिवस ब्लॉक आहे. हा ब्लॉक दरोज दुपारी १२ ते ३ या वेळेत असेल. ब्लॉक काळात मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक वळवण ते वर्सोली मार्गे वळविण्यात येणार आहे. एक्सप्रेस वे वर डोंगरगाव- कुसगाव येथे पुलावर गर्डर टाकण्याच्या कामासाठी हा ब्लॉक आहे. या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक एक्सप्रेस वे वरुन सुरू राहणार आहे. पण मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक ब्लॉक काळात बंद असेल. प्रवाशांनी ब्लॉकच्या काळात पर्यायी मार्गाचा अवलंब करावा; असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मुंबई आणि पुणे यांच्या दरम्यान एक्सप्रेस वे वर मिसिंग लिंक तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. या कामाचा भाग म्हणून हा ब्लॉक घेतला जाणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पर्यायी रस्त्याचे अर्थात मिसिंग लिंकचे काम जून २०२५ पर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे. हा मार्ग जून महिन्यात प्रवासाकरिता खुला करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मिसिंग लिंक अर्थात पर्यायी मार्गामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास १३.३ किमी. अंतराने कमी होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन यात बचत होईल. पर्यायाने पैसाही वाचेल.

लोणावळा येथे द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र येतात आणि पुढे खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात. आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट हा रस्ता सहा पदरी असून, या भागात १० पदरी वाहतूक येऊन मिळते. या भागामध्ये घाट व चढ-उताराचे प्रमाण जास्त आहे. दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात. त्यामुळे मुंबईकडे येणारा डोंगरालगतचा एक मार्ग पावसाळ्यात बंद ठेवावा लागतो. या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील १३.३ किलोमीटर लांबीच्या पर्यायी रस्त्याचे काम एमएसआरडीसीकडून हाती घेण्यात आले आहे. या पर्यायी रस्त्यावरील लोणावळा येथून जाणाऱ्या खोपोली एक्झिटपासून ते सिंहगड इस्टिट्यूटपर्यंत असणाऱ्या १९.८ किलोमीटर अंतराच्या बोगद्यांचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. या भागात डोंगरभाग मोठ्या प्रमाणात असून १३० मीटर उंचीच्या केबल पुलावर काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *