महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ फेब्रुवारी ।। पुणेकरांना थोडासा धक्का देणारी बातमी आहे, कारण, मागील २४ तासांत पुण्यात जीबीएस आजाराचे १० रूग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत मृताची संख्या पाचवर पोहचली आहे. गेल्या काही दिवसांत जीबीएस आजाराने पुण्यात विळखा वाढवलाय.
जीबीएस आजाराने गेल्या २४ तासात पुण्यातील दोन आणि पिंपरी येथील एकाचा मृत्यू झाला आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून आतापर्यंत जीबीएस आजाराने पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. (GBS outbreak in Pune)
गेले 24 तासात नव्याने १० जीबीएस बाधित रूग्ण सापडले आहेत. राज्यातील जीबीएस बाधित रुग्णसंख्या १४० वर पोहोचली आहे. त्यामध्ये २६ रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील, तर ७८ रुग्ण समाविष्ट गावातील आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील १५, ग्रामीणमधील १० तर इतर जिल्ह्यातील ११ रुग्णांचा समावेश आहे.
त्यातील १८ रुग्ण व्हेंटीलेटरवर असून, बाधित रुग्णसंख्येत २० ते २९ वयोगटातील सर्वाधिक ३२, तर ० ते ९ आणि ५० ते ५९ वयोगटातील प्रत्येकी २२ रुग्ण आहेत. १० ते १९ वयोगटातील २० रुग्ण उपचार घेत आहेत.