![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ फेब्रुवारी ।। बीएसएनएल ही भारतातील एकमेव सरकारी टेलिकॉम कंपनी आहे, जी आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानसाठी ओळखली जाते. बीएसएनएलच्या स्वस्त रिचार्ज प्लानमुळे गेल्या काही महिन्यांत अनेकांनी आपला नंबर बीएसएनएलला पोर्टही केला आहे. एवढंच नाही तर रिचार्ज प्लानव्यतिरिक्त बीएसएनएल आपल्या युजर्ससाठी एक खास सर्व्हिस देत आहे. त्यापैकीच एक सेवा म्हणजे बीएसएनएलची BiTV सेवा.
बीएसएनएलनं नुकतीच भारतभर आपली BiTV सेवा सुरू केली आहे. बीएसएनएलच्या BiTV सेवेद्वारे बीएसएनएल युजर्स ४५० हून अधिक टीव्ही चॅनेल्स मोफत पाहू शकतात. बीएसएनएलनं यासाठी ओटीटी प्लेसोबत भागीदारी केली आहे. विशेष म्हणजे बीएसएनएल युजर्सना या सेवेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.
स्वस्तात मिळणार ही सेवा
बीएसएनएलनं आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. बीएसएनएल युझर्स ९९ रुपयांच्या स्वस्त व्हॉईस ओन्ली प्लानमध्ये विनामूल्य BiTV देखील वापरू शकतात. बीएसएनएलचा ९९ रुपयांचा प्लान नुकताच बीएसएनएलने लाँच केला होता. बीएसएनएलचा हा अत्यंत स्वस्त व्हॉईस ओन्ली प्लान आहे.
काय आहे खास?
बीएसएनएलच्या ९९ रुपयांच्या प्लानबद्दल बोलायचं झालं तर युजर्संना यात पूर्ण १७ दिवसांची वैधता मिळते. १७ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये युजर्सना अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. त्याचबरोबर युजर्स या प्लानमध्ये BiTV सेवेचाही लाभ घेऊ शकतात.
