SGB Scheme: सॉवरेन गोल्ड बाँड स्कीम योजनेला टाळं का?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ फेब्रुवारी । भौतिक (फिजिकल) सोन्याची खरेदी कमी करण्यासाठी आणि डिजिटल सोन्याला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली सॉवरेन गोल्ड बाँड योजना केंद्र सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. होय, एकीकडे सोन्याच्या किमती गगनाला भिडत आहेत तर दुसरीकडे, बाजारभावापेक्षा कमी किमतीत लोकांना स्वस्त सोने उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेली सरकारी योजना आता बंद होणार आहे. भारत सरकारने ही योजना २०१५ मध्ये सुरू केली होती तर, चालू आर्थिक वर्षात या योजनेचा एकही हप्ता जारी करण्यात आलेला नाही.

स्वस्त सोने खरेदीची योजना बंद होणार

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी स्वतः सॉवरेन गोल्ड बाँड स्कीम म्हणजेच एसजीबी (सार्वभौम सुवर्ण रोखे) स्कीमबाबत संकेत दिले आहेत. शनिवारी अर्थसंकल्पानंतर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी संबंधित प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, आम्ही SGB योजना बंद करण्याच्या मार्गावर आहोत. सॉवरेन गोल्ड बाँड योजनेअंतर्गत सरकारला जास्त व्याज द्यावे लागत होते, ज्यामुळे कर्ज घेण्याचा खर्च वाढत होता. परिणामी सरकारवरील आर्थिक भार वाढत होता. त्यामुळे केंद्र सरकारने आता ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

SGB योजनेवर अर्थमंत्री काय म्हणाल्या…
अर्थसंकल्पानंतर माध्यमांशी झालेल्या संवादादरम्यान, सरकार सॉव्हरेन गोल्ड बाँड योजना बंद करणार आहे का असे विचारले असता अर्थमंत्री सीतारामन यांनी उत्तर दिले की हो, आम्ही तसे करणार आहोत, या मार्गावर आहोत. अर्थमंत्र्यांनी मोदी 3.0 च्या पूर्ण अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या पण, एसजीबी योजनेबद्दल एक शब्दही नाही काढला.

लोकांच्या फायद्याची योजना बंद होणार
या योजनेअंतर्गत सरकारचा कर्ज घेण्याचा खर्च वाढत होता आणि ही योजना सरकारसाठी महागडी ठरत होती तरीही सामान्य गुंतवणूकदारांना या योजनेतून चांगला परतावा मिळत होता. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार गेल्या काही वर्षांत SGB योजनेने गुंतवणूकदारांना १६०% पर्यंत परतावा दिला पण आर्थिक दृष्टिकोनातून योजना सरकारला महागात पडत आहे. दरम्यान, सरकार सॉवरेन गोल्ड बाँड बंद करणार असले तरी इतर नवीन योजनांचा विचार करत आहे, ज्यामध्ये गोल्ड ईटीएफ (एक्सचेंज-ट्रेडेड फंड) आणि इतर वित्तीय उत्पादने समाविष्ट आहेत. या योजना गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्याचा एक सुरक्षित आणि सोपा पर्याय मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *