महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि.५ फेब्रुवारी ।। पुण्यामध्ये जीबी सिंड्रोम आजार वेगाने हातपाय पसरत आहे. दिवसेंदिवस या आजाराची लागण झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आज पुन्हा रुग्णसंख्येत भर पडली आहे. पुण्यातील जीबी सिंड्रोमची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा १६६ वर पोहचला आहे. जीबी सिंड्रोमच्या ५ संशयित रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये आतापर्यंत १६६ जीबीएसची लागण झालेले रुग्ण सापडले आहेत. यापैकी १३० रुग्णांची जीबीएस म्हणून निदान निश्चित झाले आहे. ५ संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ३३ रुग्ण पुणे मनपा, ८६ रुग्ण नव्याने पुणे मनपा अंतर्गत समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत. १९ रुग्ण पिंपरी-चिंचवड मनपा आणि २० रुग्ण पुणे ग्रामीण आणि इतर जिल्ह्यातील आहेत. यापैकी ५२ रुग्णांना डिस्चार्ज देणअयात आला आहे. तर ६१ रुग्ण आयसीयूमध्ये आणि २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
जीबीएसचे रुग्ण वाढल्यावर पुणे महापालिकेला जाग आली आहे. पुण्यातील दूषित पाणी आढळलेल्या आरओ प्लांटला महापालिकेकडून टाळं ठोकण्यात आलं आहे. सिंहगड रस्ता परिसरात तब्बल १९ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. आरो प्लांटमध्ये कॉलिफॉर्म बॅक्टेरिया आढळला आहे.
नांदेड सिटी, किरकिटवाडी, नांदोशी धायरी, डीएसके विश्व, आंबेगाव आणि सिंहगड रस्ता परिसरातील रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्यामुळे महानगरपालिकेने या परिसरातील आरो प्लांटची पाहणी केली होती. त्यामध्ये कॉलिफॉर्म जिवाणू असल्याचं आढळलं होतं. त्यानुसार महापालिकेने या आरो प्लांटला नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर थेट कारवाई देखील आता करण्यात आली आहे.
जीबीएस आजाराची लक्षणं –
– अचानक पायातील किंवा हातात येणारी कजोरी अथवा लकवा
– अचानकपणे उद्भवलेले चालण्यातील भास किंवा कमजोरी
– डायरिया
नागरीकांनी कशी घ्यावी काळजी –
– पिण्याचे पाणी दुषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
– पाणी उकळून पिणे.
– अन्न स्वच्छ आणि ताजे असावे.
– वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.
– शिळे अन्न आणि अर्धवट शिजलेले अन्न (चिकन, मटण) खावू नये.
– नागरिकांनी घाबरून न जाता या आजाराची लक्षणे आढल्यास त्वरीत शासकीय रुग्णालयात जावे.