Devendra Fadnavis : वर्षा बंगल्याच्या चर्चा ; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली मोजक्या शब्दात प्रतिक्रिया म्हणाले …

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि.५ फेब्रुवारी ।। महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल महायुतीच्या पारड्यात पडला आणि राज्यात भाजपप्रणित महायुतीचीच सत्ता आली. मंत्र्यांचे, मुख्यमंत्र्यांचे शपथविधी होऊन प्रत्येकाला शासकीय निवासस्थानंही सुपूर्द करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावेसुद्धा शासकीय निवासस्थान म्हणून ओळख असणाऱ्या वर्षा बंगल्याची नोंद करण्यात आली. पण, बरेच दिवस उलटूनही अद्याप मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी वास्तव्यास सुरुवात केलेली नाही. त्यामुळं विरोधी पक्षांपासून समाजाच्या अनेक स्तरांमध्ये याविषयीची चर्चा सुरु झाली.

वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये कामाख्या मंदिरात बळी देण्यात आलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग पुरल्याची चर्चा असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी दिला आणि पुन्हा एकदा वर्षा बंगला अन् त्याभोवती फिरणाऱ्या चर्चांना आणखी वाव मिळाला. त्याच दरम्यान एका माध्यमसमुहाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी हजेरी लावली. जिथं वर्षा बंगल्याविषयीचा प्रश्न त्यांना टाळता आला नाही. अखेर मुख्यमंत्र्यांनीच इथं मुक्कामी जाण्यास नेमकी दिरंगाई का होतेय, यासंदर्भातील प्रश्नांची उत्तरं देत चर्चांना पूर्णविराम दिला.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
फडणवीस वर्षा बंगल्यात वास्तव्यास का जात नाहीत, वर्षा बंगल्यात अमूक, तमूक… आणि अगदी हा बंगला पाडण्याविषयीच्याही चर्चा समोर आल्याचं पाहता त्यांनी काही गोष्टी स्पष्टच सांगितल्या. ‘वर्षा ही काय कोणाच्या घरची मालमत्ता आहे का?’ असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

माजी मुख्यमंत्र्यांनी हे निवासस्थान सोडल्यानंतर आपण तिथे वास्तव्यास होतो किंबहुना जाणार आहोत. पण, तत्पूर्वी तिथं काही लहान- मोठी कामं सुरु होती असं त्यांनी सांगितलं. ‘माझी मुलगी ही दहावीत शिकत आहे’, असं सांगत 17 तारखेपासून तिची परीक्षा सुरू होत असल्यामुळं परीक्षेनंतर आपण तिथं राहायला जाऊ असं तिनंच सांगितल्यामुळं आपण तूर्तास वर्षा निवासस्थानी वास्तव्यास गेलो नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.

मुलीची परीक्षा पार पडताच आपण वर्षा या निवासस्थानी मुक्कामी जाणार असल्याचं सांगत एकंदरच सुरु असणाऱ्या चर्चा पाहता आपण यावर उत्तरही देऊ नये असं वाटतं, इतक्या मोजक्या शब्दांत त्यांनी काही मुद्दे अधोरेखित करत विरोधकांनाही उत्तर दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *