![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी – मंगेश खंडाळे| दि. ९ फेब्रुवारी २०२६ || बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांसाठी बंद ठेवण्याच्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. हा निर्णय असंवैधानिक, बेकायदेशीर आणि प्रशासकीय मनमानी असल्याचा आरोप करत पतित पावन संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर निवेदन सादर केले. संघटनेच्या मते, कोट्यवधी शिवभक्तांच्या श्रद्धेवर थेट आघात करणारा हा आदेश असून भारतीय संविधानाच्या कलम २५ अंतर्गत मिळणाऱ्या उपासनेच्या मूलभूत अधिकारांची उघड पायमल्ली आहे.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, सार्वजनिक सुव्यवस्थेच्या नावाखाली संपूर्ण बंदी घालणे हा प्रमाणबाह्य उपाय आहे. वेळापत्रकानुसार दर्शन, टप्प्याटप्प्याने प्रवेश, कडक पोलिस बंदोबस्त आणि गर्दी नियंत्रण यांसारखे कमी निर्बंधात्मक पर्याय उपलब्ध असताना मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय न्यायालयातही टिकणारा नाही. महाशिवरात्रीसाठी लाखो भाविक वर्षभर नियोजन करतात; उपास-तापास, प्रवासाचा खर्च आणि भक्तीभाव याकडे दुर्लक्ष करून दर्शनच बंद करणे म्हणजे श्रद्धेची गळचेपी असल्याचा सूर संघटनेने लावला.
या पार्श्वभूमीवर पतित पावन संघटनेने महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिर तात्काळ खुले ठेवावे, विशेष सुरक्षा व गर्दी नियंत्रण आराखडा जाहीर करावा आणि बंदीचा निर्णय रद्द करावा अशी ठाम मागणी केली. अन्यथा संविधानिक अधिकारांच्या संरक्षणासाठी कायदेशीर व लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला. निवेदन सादर करताना संघटनेचे स्वप्निल नाईक, मनोज पवार, स्वप्निल आंग्रे आणि राजाभाऊ रजपूत उपस्थित होते. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी या निवेदनाची दखल घेत महाशिवरात्रीला पूजा व दर्शनाची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन संघटनेला दिले आहे.
