![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि.६ फेब्रुवारी ।। तिरुपती बालाजी मंदिराची प्रशासकीय संस्था असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ने १८ बिगर-हिंदू कर्मचाऱ्यांवर मंदिरातील उत्सव आणि विधींना उपस्थित राहून हिंदू धार्मिक कार्यात सहभागी झाल्याचा आरोप करत कारवाई केली आहे. टीटीडीचे अध्यक्ष बीआर नायडू यांच्या निर्देशानुसार, मंडळाने मंदिराचे आध्यात्मिक पावित्र्य राखण्याची वचनबद्धता दर्शवत त्यांना काढून टाकण्याचे आदेश जारी केले आहेत.
नुकतेच टीटीडी बोर्डाच्या बैठकीत यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मंजूर झालेल्या प्रस्तावानुसार, या कर्मचाऱ्यांना सरकारी विभागात बदली करण्याचा किंवा स्वेच्छा निवृत्ती निवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे. मंदिर प्रशासनात किंवा धार्मिक विधींमध्ये गैर-हिंदू व्यक्तींचा सहभाग असू नये यावर मंडळाने भर दिला आहे. भविष्यात असे प्रकार आढळल्यास कडक कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे.
जगन मोहन रेड्डी सरकारमध्ये भरती
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील मागील जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात बिगर-हिंदू कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. सध्या राज्यात चंद्राबाबू नायडू यांचे सरकार सत्तेत आहे. त्यांचे सरकार सत्तेत आल्यापासून, या भरती गेल्या काही काळापासून वादाचा विषय आहेत. मंदिर प्रशासनाने इतर धार्मिक पार्श्वभूमीतील लोक पदांवर असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.
तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ट्रस्ट बोर्डाने १८ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत तिरुमला श्री बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा आणि त्यांना आंध्र प्रदेश सरकारच्या इतर विभागांमध्ये स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला. खोटे शपथपत्र आणि धर्मांतराबद्दल चिंता व्यक्त करून, ट्रस्टचे अध्यक्ष बी.आर. नायडू यांनी मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावे असा आग्रह धरला आहे.
पावित्र्याला हानी- ट्रस्ट
ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष बी.आर. नायडू यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, टीटीडी मंदिरांमध्ये सण, मिरवणुका आणि इतर हिंदू कार्यक्रमांशी संबंधित कर्तव्ये या कर्मचाऱ्यांना सोपवता कामा नयेत. याची विशेष काळजी घ्यावी. हे कर्मचारी तिरुमलाच्या पावित्र्याला हानी पोहोचवत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.
![]()
