महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि.६ फेब्रुवारी ।। ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याचे चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणे अवघड होऊन बसलेले असताना कांगारूंना आणखी एक धक्का बसला आहे. त्यांचा स्टार ऑल राऊंडर मार्कस स्टॉयनिस याने अचानक वन डे क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य असलेल्या स्टॉयनिसने वन डे क्रिकेटमधून तात्काळ निवृत्ती घेण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे, परंतु तो ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये राष्ट्रीय संघाकडून खेळणार आहे.
स्टॉयनिसचा या महिन्याच्या अखेरीस पाकिस्तान आणि युएईमध्ये सुरू होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठीच्या ऑस्ट्रेलियाच्या प्राथमिक १५ सदस्यीय संघात समावेश केला गेला होता.पण, त्याच्या निवृत्तीमुळे संघात बदल होणार आहे. ३५ वर्षीय अष्टपैलू खेळाडू सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील ट्वेंटी-२० फ्रँचायझी स्पर्धेत डर्बनच्या सुपर जायंट्सकडून खेळत आहे. जिथे त्याला गोलंदाजी करताना हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याचे वृत्त आहे.
“ऑस्ट्रेलियासाठी वन डे क्रिकेट खेळणे हा एक अविश्वसनीय प्रवास होता. मी या सुवर्णकाळात घालवलेल्या प्रत्येक क्षणाबद्दल कृतज्ञ आहे. सर्वोच्च स्तरावर माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे ही गोष्ट मी नेहमीच जपून ठेवेन. हा निर्णय सोपा नव्हता, पण मला वाटते की वन डे क्रिकेटमधून निवृत्त होण्याची आणि माझ्या कारकिर्दीच्या पुढील टप्प्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याची हिच योग्य वेळ आहे,” असे स्टॉयनिसने सांगितले.
२०१९च्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कारांमध्ये तो सर्वोत्तम वन डे खेळाडू ठरला होता. त्याने २०१५ मध्ये वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्याने ७१ वन डे सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. त्याने १४९५ धावा केल्या आहेत आणि १ शतक व ६ अर्धशतकं झळकावली आहेत. इडन पार्कवर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सातव्या क्रमांकावर येताना त्याने ११७ चेंडूंत १४६ धावांची खेळी केली होती.
वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ४८ विकेट्सही आहेत. तो २०२३ च्या वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाचा संघाचा सदस्य होता.