महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि.६ फेब्रुवारी ।। राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणात मोठा दणका बसला आहे. धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी केलेल्या तक्रारीप्रकरणी वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडे यांना दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर घरगुती हिंसाचाराशी संबंधित केलेले आरोप मान्य करत त्यांना दोषी ठरवलं. तसंच धनंजय मुंडे यांनी दरमहा २ लाख रुपये पोटगी म्हणून करुणा मुंडे यांना द्यावेत, असे आदेशही न्यायलयाने दिले आहेत.
मंत्री धनंजय मुंडे हे मागील काही आठवड्यांपासून वादात सापडले आहेत. बीड जिल्ह्यातील पवनचक्की खंडणी प्रकरण, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, कथित पीक विमा घोटाळा, तसंच कृषी खात्यातील साहित्य खरेदी घोटाळ्यावरूनही मुंडे यांच्या गंभीर आरोप झाले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच वांद्रे कौंटुबिक न्यायालयाने घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवल्याने धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.
