महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि.६ फेब्रुवारी ।। दोन वेळच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला धक्क्यांमागून धक्के बसत आहेत. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच स्टार ऑल राऊंडर मार्कस स्टॉयनिसने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतली. त्यात आणखी दोन खेळाडू या स्पर्धेत खेळणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे आणि या दोनपैकी एक खेळाडू टीम इंडियाचा कट्टर वैरी आहे. ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने टीम इंडियाची नेहमीच डोकेदुखी वाढवली आहे आणि त्यानेच माघार घेतल्याने रोहित अँड कंपनीचं निम्म टेंशन हलकं झालं आहे.
ऑस्ट्रेलियाच्या प्राथमिक संघात आता चार बदल करावे लागणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाने १५ सदस्यीय संघ जाहीर केला होता आणि आता कर्णधार पॅट कमिन्स आणि जलदगती गोलंदाज जोश हेझलवूड यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. मार्कस स्टॉयनिसच्या निवृत्तीच्या निर्णायनंतर हा ऑस्ट्रेलियालासाठी मोठा धक्का आहे. अष्टपैलू खेळाडू मिचेल स्टार्क याने आधीच माघार घेतली होती. आता ऑस्ट्रेलिया कोणत्या चार खेळाडूंना संधी देतो आणि कर्णधारपदी कोण बसतो, याची उत्सुकता आहे.
नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत कमिन्सचा घोटा दुखावला गेला होता आणि तो त्यातून पूर्णपणे बरा झालेला नाही. हेझलवूडलाही दुखापत झाली होती. या दोन्ही खेळाडूंना पूर्णपणे बरं होण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या आयपीएल खेळण्यावरही प्रश्नचिन्स निर्माण झाला आहे. ऑस्ट्रेलियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सामना सामना करायचा आहे आणि जूनमध्ये लॉर्ड्सवर हा सामना होणार आहे.
‘जोश हेझलवूड, पॅट कमिन्स व मिचेल मार्श हे दुखापतीमुळे आमच्यासोबत चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्यासाठी येणार नाहीत,’असे निवड समितीचे प्रमुख जॉर्ज बेली यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियाचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना २२ फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध होणार आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिका ( २५ फेब्रुवारी) व अफगाणिस्तान ( २८ फेब्रुवारी) यांच्याविरुद्ध त्यांना खेळायचे आहे.
ऑस्ट्रेलियाचा प्राथमिक संघ – पॅट कमिन्स ( कर्णधार), अॅलेक्स केरी, नॅथन एलिस, आरोन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जॉश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, अॅडम झम्पा