महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि.६ फेब्रुवारी ।। केंद्र सरकार देशातील विविध घटकांसाठी विविध बचत योजना आणि गुंतवणूक योजना राबवत आहे. सुकन्या समृद्धी योजना ही देखील याच गुंतवणुकीच्या योजनांपैकी एक आहे, ज्यामध्ये मुलींच्या नावे खातं उघडलं जाऊ शकतं. या योजनेअंतर्गत ज्या मुलींचे वय १० वर्षांपेक्षा कमी आहे, त्यांचीच खाती उघडता येतात. या सरकारी योजनेवर मुलींना ८.२ टक्क्यांचं भरघोस व्याज मिळत आहे. इथे आपण या योजनेशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी १ लाख रुपये जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील, हेही पाहू.
वर्षभरात दीड लाख जमा करता येतात
सुकन्या समृद्धी योजनेत एका कुटुंबातील जास्तीत जास्त २ मुलींची खाती उघडता येतात. मात्र, ज्या कुटुंबात जुळ्या मुली आहेत, अशा कुटुंबांमध्येही २ पेक्षा जास्त खाती उघडता येतात. या योजनेत तुम्ही वर्षाला किमान २५० ते जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करू शकता. सुकन्या समृद्धी योजनेचं खातं कोणत्याही बँकेत उघडता येतं. या योजनेअंतर्गत बँकांव्यतिरिक्त पोस्ट ऑफिसमध्येही खातं उघडता येतं.
२१ वर्षांनंतर योजना मॅच्युअर होते
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत तुम्हाला १५ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. मुलीच्या नावानं उघडलेलं खातं २१ वर्षांनंतर मॅच्युअर होतं. मात्र जेव्हा तुमची मुलगी १८ वर्षांची होईल आणि तुम्हाला तिचं लग्न करायचं असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही अकाउंट बंदही करू शकता. याशिवाय काही वेगळ्या परिस्थितीत ५ वर्षांनंतर खाते बंद ही केले जाऊ शकते. लक्षात ठेवा खातं उघडल्याच्या तारखेपासून ५ वर्षानंतरच खातं बंद केलं जाऊ शकतं.
मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
जर या सरकारी योजनेत दरवर्षी १ लाख रुपये जमा केले तर २१ वर्षांनंतर म्हणजेच मॅच्युरिटीच्या वेळी तुमच्या मुलीच्या खात्यात एकूण ४६,१८,३८५ रुपये येतील. यामध्ये तुमच्या गुंतवणुकीचे १५,००,००० रुपये आणि व्याजाचे ३१,१८,३८५ रुपयांचा समावेश आहे. ही सरकारी योजना आहे, त्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारचा धोका नाही. या योजनेत तुम्हाला फिक्स्ड आणि गॅरंटीड रिटर्न मिळतो.