महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि.६ फेब्रुवारी ।। पिंपरी चिंचवड येथे विविध विकास कामांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. मात्र याच वेळी खाली बसलेल्या काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात शिट्ट्या वाजल्याचे दिसताच अजित पवार यांचा पारा चढला आणि त्यांनी व्यासपीठावरुन खडसावले.
अजित पवारांच्या तंबीनंतर लगेचच शिट्ट्या वाजवणे बंद झाले. नंतर सत्कार कार्यक्रम सुरळीत पार पडला. पिंपरी चिंचवड येथे पोलीस आयुक्तालय भूमिपूजन कार्यक्रमात हा सर्व प्रकार घडला आहे.
नेमकं काय घडलं?
मंचावर मान्यवरांचे सत्कार सोहळे सुरु असताना खाली बसलेल्या काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात शिट्ट्या वाजवल्या. ही गोष्ट अजित पवार यांच्या लक्षात येताच, अजितदादांचा पारा चढला. त्यांनी थेट माईक हातात घेतला.
अजित दादा काय म्हणाले?
या अतिउत्साही कार्यकर्त्यांना दादांनी चांगलेच सुनावले, हा मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आहे ना, का शिट्ट्या वाजवायचा कार्यक्रम आहे? काही शिस्त बिस्त आहे की नाही? या भाषेत अजित पवारांनी भर कार्यक्रमांमध्ये कार्यकर्त्यांना सुनावले.
या कार्यक्रमासाठी गृह राज्यमंत्री योगेश कदम, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, विजय शिवतारे, अण्णा बनसोडे, सुनील शेळके, शरद सोनवणे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय चौबे यांसह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अजितदादांनी लांडगेंना सुनावलं
दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी अजितदादांचे नाव घेणे टाळले, विकास कामे झाले ती फक्त मुख्यमंत्र्यांमुळेच झाली, असं ते म्हणाले. त्यानंतर अजितदादांनी महेश लांडगे यांना भाषणातून सुनावले, माझं नाव घ्यायला काय लाज वाटते काय माहिती, अशा शब्दात अजितदादांनी लांडगेंना सुनावलं
भाजपचा राष्ट्रवादी-शिवसेनेला शह
दरम्यान, रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सत्ताधारी महायुतीत संघर्ष सुरु असतानाच, आता भाजपने बुधवारी १७ जिल्ह्यांत संपर्कमंत्र्यांची नेमणूक जाहीर केली. ज्या जिल्ह्यांत भाजपचा पालकमंत्री नाही, त्या जिल्ह्यांत संपर्कमंत्री देऊन पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षांना एकप्रकारे शह दिल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे पालकमंत्री असलेल्या ठाणे आणि मुंबई शहर या दोन जिल्ह्यांत भाजपने अनुक्रमे शिंदे यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले वनमंत्री गणेश नाईक आणि कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांची नेमणूक केली आहे.
