पुण्यात अवजड वाहनांना 24 तास बंदी; वाहतूक पोलिसांचे आदेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी ।। गंभीर अपघात, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहरात अवजड वाहनांना 24 तास बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाहतूक शाखा, महापालिका आणि संबंधित विभागाकडून एकात्मिक प्रयत्न करून निर्णयाची अंमलबजावणीच्या दृष्टीने वाहतूक शाखेने शहरात येणार्‍या जडवाहनांवर प्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे.

यामधून मुंबई- बंगळुरू महामार्ग वगळण्यात आला आहे. तसेच, वाहतूक पोलिसांनी शहरात काही ’रेड झोन’ मार्ग तयार केले असून या मार्गांवर वाहतूक शाखेच्या पूर्वपरवानगीनेच प्रवेश दिला जाणार आहे, असे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले.

अत्यावश्यक सेवेतील अवजड वाहनांना रात्री बारा ते सकाळी सहा या वेळेत प्रवेश करण्यास मुभा देण्यात आली आहे. अवजड वाहनांनी नगर रस्ता, खराडी बाह्यवळण मार्ग, शास्त्रीनगर चौक, येरवड्यातील गोल्फ क्लब चौक, आळंदी रस्ता, होळकर पूल, खडकीमार्गे इच्छितस्थळी जावे. खराडी बाह्यवळण मार्ग, मुंढवा चौक, मगरपट्टा, भैरोबानाला, लुल्लानगर चौक, गंगाधाम चौक, मार्केट यार्डमार्गे इच्छितस्थळी जावे. सोलापूर रस्त्याने येणार्‍या अवजड वाहनांनी हडपसर, भैरोबानाला, लुल्लानगर चौक, गंगाधाम चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. हडपसरकडून मंतरवाडी, सासवड रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे, असे आवाहन झेंडे यांनी केले आहे.

बंदी घातलेले मार्ग

नगर रस्ता – विमाननगर चौक ते दत्त मंदिर चौक, शास्त्रीनगर चौकातून कल्याणीनगरकडे जाण्यास मनाई, येरवड्यातील पर्णकुटी चौकातून कोरेगाव पार्ककडे जाण्यास बंदी, वडगाव शेरीतून कल्याणीनगर भागातील बिशप शाळेकडे जाण्यास मनाई, पेट्रोल साठा चौकातून लोहगाव विमानतळ रस्त्याकडे जाण्यास बंदी,

जुना मुंबई- पुणे रस्ता- पाटील इस्टेटकडून शिवाजीनगर अभियांत्रिकी चौकाकडे जाण्यास बंदी. गणेशखिंड रस्ता – ब्रेमेन चौकातून विद्यापीठाकडे जाण्यास बंदी, ब्रेमेन चौकातून औंध परिहार चौकाकडे जाण्यास बंदी, औंध- वाकड रस्त्यावरून महादजी शिंदे पुलावरून पुढे जाण्यास बंदी. बाणेर रस्ता- राधा चौकातून बाणेरकडे जाण्यास बंदी, पौड रस्ता- पौड रस्त्यावरून नळस्टॉपकडे जाण्यास बंदी, पौड रस्त्यावरून विधी महाविद्यालय रस्त्याकडे जाणार्‍या अवजड वाहनांना बंदी.

कर्वे रस्ता – कर्वे पुतळा, कोथरूडकडून पौड फाटा चौकात जाण्यास बंदी. सिंहगड रस्ता – राजाराम पुल-स्वारगेटकडे जाण्यास बंदी, राजाराम पूल चौकातून कर्वेनगर, डीपी रस्त्याकडे जाण्यास बंदी. सातारा रस्ता – मार्केट यार्ड चौकातून स्वारगेटकडे जाण्यास प्रवेश बंदी, दांडेकर पुलाकडून शास्त्री रस्त्याकडे जाण्यास बंदी, मित्रमंडळ चौकातून सारसबागेकडे जाण्यास बंदी.

सोलापूर रस्ता- सेव्हन लव्हज चौकातून टिंबर मार्केटकडे जाण्यास बंदी, स्वारगेटकडे जाण्यास बंदी, गोळीबार मैदान चौकातून लष्करकडे जाण्यास बंदी. भैरोबानाला चौकातून एम्प्रेस गार्डनकडे जाण्यास बंदी, रामटेकडी चौकातून बी. टी. कवडे रस्त्यावर जाण्यास बंदी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *