घरगुती वीज स्वस्त होणार : जुने मीटर बदलावे लागणार ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ फेब्रुवारी ।। राज्यातील घरगुती वीज ग्राहकांना लवकरच स्वस्त दराने वीजपुरवठा केला जाणार आहे. यासंदर्भात महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या वीज दर प्रस्तावामध्ये घरगुती ग्राहकांसाठीच्या वीज दरात टप्प्याटप्प्याने कपात करण्यास परवानगी मागितली आहे. सोबतच दिवसा वीज वापरल्यास ग्राहकांना अधिक सवलत देण्याचेही प्रस्तावित केले आहे. महावितरणमधील सूत्रांनी ही माहिती दिली. येत्या एप्रिलपासून याची कार्यवाही होण्याचे संकेत असून त्यामुळे वीज दरात प्रतियुनिट 80 पैसे ते एक रुपयापर्यंत कपात होऊ शकते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने गेल्या अडीच वर्षांत ऊर्जा परिवर्तासाठी भरीव काम करून सौर ऊर्जा वापराला महत्त्व दिले आहे. सौर ऊर्जेद्वारे निर्माण झालेली वीज स्वस्तात मिळाल्यामुळे महावितरणला विजेचे दर कमी करणे शक्य होणार आहे. त्यासोबतच सौर ऊर्जा दिवसा मिळणार असल्याने त्यावेळी जे घरगुती ग्राहक वीज वापरतील त्यांना प्रत्येक युनिटमागे 80 पैसे ते 1 रुपया सवलत देण्याचा प्रस्ताव मांडणेही महावितरणला शक्य झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

महावितरणने विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार घरगुती ग्राहकांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेतील वीज वापरासाठीच्या दरात सवलत देण्यात येईल. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये प्रति युनिट 80 पैसे, 2026-27 मध्ये 85 पैसे, 2027-28 मध्ये 90 पैसे, 2028-29 मध्ये 95 पैसे आणि 2029-30 या वर्षात 1 रुपया सवलत देण्यात येईल. आयोगाने मान्यता दिल्यानंतर 1 एप्रिलपासून ही सवलत सुरू होऊ शकते.

उद्योगांची सुविधा मिळेल
कोणत्या वेळी वीज वापरली, त्यानुसार विजेच्या दरात सवलत देण्यास तांत्रिक भाषेत टीओडी (टाईम ऑफ डे) म्हणतात. ही सुविधा आतापर्यंत केवळ उद्योगांना होती. आता ती उद्योगधंद्यांसोबतच घरगुती ग्राहकांनाही देण्यात येणार आहे. घरगुती वीज वापरात मिक्सर, इस्त्री, वॉशिंग मशिन, ओव्हन इत्यादींना मोठ्या प्रमाणात वीज लागते. या उपकरणांचा वापर सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत करण्याचे नियोजन केले तर घरगुती ग्राहकांना टीओडी सवलतीचा प्रभावी वापर करता येईल. तसेच उन्हाळ्यात दिवसा पंखे, कूलर आणि एसी यांचा वापर वाढतो. त्यावेळीही ग्राहकांना टीओडी सवलतीचा उपयोग होईल.

जुने मीटर बदलावे लागणार
टीओडी सुविधा मिळण्यासाठी वीज ग्राहकाने कोणत्या वेळेला विजेचा वापर केला हे समजणे आवश्यक आहे. घरगुती ग्राहकांकडे सध्या बसविलेल्या मीटरमध्ये टीओडीची सुविधा नाही. तथापि घरगुती ग्राहकांना टीओडी सवलतीचा लाभ घेता यावा यासाठी महावितरणकडून मोफत टीओडी मीटर बसवून देण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *