महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ फेब्रुवारी ।। भारतीय संघानंतर आता ऑस्ट्रेलिया संघाला ही ५ मोठे धक्के बसले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तात्पुरत्या संघात बदल करण्यात आले असून कर्णधारसह ५ प्रमुख खेळाडूंना संघाबाहेर जावे लागले आहे. त्यांच्याजगी नव्या चेहऱ्यांना संघात संधी देण्यात आली आहे. तर, स्टीव्ह स्मिथवर संघाची धुरा सोपवण्यात आली आहे.
कर्णधार पॅट कमिन्स भारताविरुद्धच्या मालिकेनंतर मैदानाबाहेर गेला. त्याला गुडघ्याच्या दुखापतीमुळे श्रीलंकेविरूद्धची मालिका खेळता आली नव्हती व त्याला आता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेलाही मुकावे लागणार आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड देखील दुखापतीमुळे मागचे काही दिवस मैदानाबाहेर आहे. त्याला भारताविरूद्ध अवघे दोन सामने खेळता आले होते. त्यानंतर हेझलवूड मैदानाबाहेर गेला. आधी तात्पुरत्या संघात हेझलवूडचा समावेश करण्यात आला होता. पण त्याला आता संघाबाहेर करण्यात आले आहे.
अष्टपैलू मिचल मार्शला पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर जावे लागले होते. पण तो आता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही खेळणार नसल्याचे निश्चित झाले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मार्कस स्टॉइनिसने निवृत्ती घेतल्यामुळे निवडकर्त्यांना त्याच्यासाठी संघातून रिप्लेस करावे लागले आहे. त्याचबरोबर आता वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क देखील चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळणार नसल्याचे समजत आहे.
त्यामुळे आता नव्या खेळाडूंसह व अनुभवी स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी मैदानात उतरणार आहे. ५ अनभुवी गोलंदाजांच्या जागी आता सिन अॅबॉट, बेन द्वारशुईस, जेक फ्रेझर मॅकगर्क, स्पेंसर जॉन्सन, तन्वीर संघा या ५ नव्या खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियन संघ :
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), सिन अॅबॉट, बेन द्वारशुईस, जेक फ्रेझर मॅकगर्क,अॅलेक्स केरी, नॅथन एलिस, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेंसर जॉन्सन, तन्वीर संघा, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, अॅडम झम्पा.