महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. १३ फेब्रुवारी ।। चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पाकिस्तानच्या क्रिकेट संघानं जबरदस्त अशी कामगिरी केलीय. तिरंगी मालिकेत करो या मरो सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३५५ धावा करत विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार मोहम्मद रिजवान आणि सलमान आघा यांनी विश्वविक्रमी भागिदारी केली. दोघांनी चौथ्या गड्यासाठी २६० धावा करून संघाला अविश्वसनीय विजय मिळवून देत फायनल गाठली.
पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात तिरंगी मालिका सुरू आहे. या मालिकेतील शेवटचा साखळी सामना रोमहर्षक असा होता. मोहम्मद रिजवान आणि सलमान आघा यांनी विक्रमी कामगिरी करत पाकिस्तानला फायनलमध्ये पोहोचवलं. आता फायनलला पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होईल. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं ५ बाद ३५२ धावा केल्या होत्या. पण पाकिस्तानने हे आव्हान फक्त चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेतून बाहेर केलं.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाकिस्तानने ३५५ धावा करत आव्हान पार केलं. पाकिस्तानचा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात इतक्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना मिळवलेला मोठा विजय ठरला. याआधी १९९२ मध्ये पाकिस्तानने ३५० पेक्षा अधिक धावांचे आव्हान पार केलं होतं. तर लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०२२ मध्ये ३४९ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात यशस्वी धावांच्या पाठलागाचा ऑस्ट्रेलियाचा २३ वर्षे जुना विक्रमही मोडला. ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३२७ धावांचं आव्हान पेललं होतं.
मोहम्मद रिजवान आणि सलमान आघा यांनी चौथ्या गड्यासाठी २६० धावांची भागिदारी करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. या जोडीने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात चौथ्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर सर्वात मोठी भागिदारी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये चौथ्या किंवा त्यापेक्षा खालच्या गड्यासाठी २५० पेक्षा जास्त धावांची भागिदारी करण्याचा नवा विक्रम दोघांनी केला. याआधी हा विक्रम अजमतुल्लाह उमरजई आणि मोहम्मद नबी यांच्या नावावर होता. त्यांनी लंकेविरुद्ध सहाव्या गड्यासाठी २४२ धावांची भागिदारी केली होती.