महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. १७ फेब्रुवारी ।। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मिनी वर्ल्डकप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीस स्पर्धेला सुरु व्हायला आता ४८ तासांहूनही कमीचा वेळ शिल्लक राहिला आहे. या स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवली जाणार असल्याने, भारतीय संघाचे सामने हायब्रिड मॉडेलनूसार दुबईत खेळवेले जाणार आहेत. या स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघ दुबईत दाखल झाला आहे. दरम्यान भारतीय संघाचे सामने केव्हा, कुठे आणि कोणत्या संघासोबत होणार आहेत? जाणून घ्या.
कुठे पाहता येतील लाईव्ह?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघाचे सर्व सामने जियोस्टारवर लाईव्ह पाहता येणार आहेत. यासह या स्पर्धेतील सामने १, २ नव्हे, तर १६ भाषांमध्ये लाईव्ह पाहता येणार आहेत. ज्यात हिंदी, इंग्रंजी, मराठी, बंगाली, हरियाणवी, तमिळ, भोजपूरी, तेलुगु आणि कन्नड भाषेतील समालोचनाचा समावेश असणार आहे.
सामने पाहण्यासाठी सब्रस्क्रिप्शन घ्यावं लागणार का?
भारतीय क्रिकेट फॅन्ससाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामने पाहण्यासाठी तुम्हाला कुठलंही सब्रस्क्रिप्शन घ्यावं लागणार नाहीये. स्टार नेटवर्ककडून याबाबत अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली आहे. डिजिटल नेटवर्कसह स्पोर्ट्स १८ वर देखील क्रिकेट फॅन्सला विविध भाषांचा पर्याय उपलब्ध असणार आहे.
२३ फेब्रुवारीला होणार महामुकाबला
भारतीय संघाच्या या स्पर्धेतील सामन्याबंद्दल बोलायचं झालं, तर भारतीय संघाचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध होणार आहे. हा सामना दुबईत खेळला जाणार असून हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरु होईल. त्यानंतर २३ फेब्रुवारीला या स्पर्धेतील सर्वात मोठा सामना, भारत- पाकिस्तान सामना होणार आहे. हा सामना देखील भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरु होईल. त्यानंतर २ मार्चला भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ भिडणार आहेत. भारतीय संघाचे सर्व सामने, दुबईत खेळले जाणार आहेत.