महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरूवार दि. २० फेब्रुवारी ।। पुण्यात जीबीएसचा प्रादुर्भाव वाढत असून या पार्श्वभूमीवर शहरातील पाण्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत कोणते घटक आढळले आणि त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो, याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जाणून घेऊया या अहवालातील मुख्य निष्कर्ष.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून GBS ने थैमान घातलं आहे. राज्यभरात GBS बाधित रुग्ण सापडत असून पुण्यात मात्र रुग्णांचे सर्वाधिक प्रमाण आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने सिंहगड रस्ता परिसरात पाणी तपासणी मोहीम हाती घेतली. या परिसरातील पाण्याचे नमुने विविध ठिकाणी पाठवण्यात आले आणि या तपासणी अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठ्यासह खासगी टँकर आणि आरओ प्रकल्पांचे पाणीसुद्धा पिण्यास अयोग्य असल्याचे समोर आलं आहे. सिंहगड रस्ता परिसरातील पाण्याच्या ७० नमुन्यांमध्ये आरोग्यास घातक असे जीवाणू आणि विषाणू आढळले आहेत. राज्यात अनेक GBS बाधित हे पुण्यातून प्रवास करून आले आणि नंतर त्यांना आजार झाला असे निदर्शनास आले. त्यामुळे सध्या पुण्याचे पाणी हे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरतंय.
या अहवालानंतर महापालिकेची पुढील कृती महत्त्वाची ठरणार आहे. पुणेकरांच्या आरोग्यासाठी पाणीपुरवठ्याशी संबंधित तातडीचे निर्णय घेतले जातील का, की परिस्थिती अधिक गंभीर होईपर्यंत प्रतीक्षा केली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लवकरात लवकर ठोस उपाययोजना होणार का? हे पाहणे गरजेचे ठरेल.