महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी ।। गेले पंधरा दिवस शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होताना दिसत होती. पारा 38 अंशांवर गेला होता. मात्र गुरुवारी कमाल तापमानात किंचित घट दिसून आली. बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती तयार झाल्याने ईशान्य भारतात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे बाष्पयुक्त वारे शहरात येण्यास सुरुवात झाल्याने गुरुवारी कमाल आणि किमान तापमानात दोन अंशांनी घट झाली होती.
शहराचे कमाल तापमान 36 ते 37 अंशांवरून गुरुवारी 35 अंश तर किमान तापमान 15 ते 18 अंशांवरून 12 ते 13 अंशांवर खाली आले होते. आगामी तीन ते चार दिवस असेच वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
महाराष्ट्रासह देशभरातील तापमानात सातत्यानं चढ उतार होत असून, हवामानात होणाऱ्या या बदलांचा आता ऋतूचक्रावरही थेट परिणाम होताना दिसत आहे. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार देशाच्या उत्तरेकडे पश्चिमी झंझावात सक्रिय असल्यामुळं पुन्हा एकदा तापमानात घट झाली असून, काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य भारतामध्ये कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली असून, दक्षिण भारतातही हेच चित्र पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास राज्यात सध्या उष्णतेचं सत्र सुरू झालं असून, त्यामुळं बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, किमान आणि कमाल तापमानामध्ये बराच फरकही पाहायला मिळत आहे. राज्याच्या विदर्भ क्षेत्रामध्ये उष्णा दर दिवसागणिक वाढत असून, सोलापुरातही चित्र वेगळं नाही.
राज्यातील तापमान अंश सेल्सिअसमध्ये
सोलापूर – 38 अंश सेल्सिअस
अकोला – 36.8 अंश सेल्सिअस
चंद्रपूर – 36.8 अंश सेल्सिअस
सांताक्रूझ- 35 अंश सेल्सिअस
रत्नागिरी- 34.3 अंश सेल्सिअस