लोको पायलटसाठी Indian Railway चं नवं फर्मान ; नारळ पाणी, कफ सिरप पिण्यावर बंदी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी ।। भारतीय रेल्वेच्या वतीनं ज्याप्रमाणे प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत रेल्वे प्रवासाशी संबंधित काही निर्णय घेतले जातात अगदी त्याचप्रमाणे रेल्वे विभागानं आता कर्मचाऱ्यांच्या अनुषंगानंही काही निर्णय घेतले आहेत. त्यातीलच एका निर्णयाची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. हा निर्णय लागू केल्यानंतर त्यासंदर्भातील बहुविध चर्चांना वाव मिळाल्याचं पाहायला मिळालं.

भारतीय रेल्वेच्याच अख्तयारित येणाऱ्या दक्षिण रेल्वेच्य तिरुवअनंतपूरम मंडळानं रेल्वेतील लोको पायलट आणि इतर रेल्वे संचालन कर्मचाऱ्यांसाठी एक नवं फर्मान जारी केलं आहे. ज्यानुसार ड्युटीआधी अर्थात काम सुरु करण्यापूर्वी किंवा कामाचे तास सुरु असताना रेल्वे कर्मचारी आणि विशेष म्हणजे लोको पायलटना विशिष्ट गोष्टींच्या सेवनास बंदी घालण्यात आली आहे.

रेल्वेच्या म्हणण्यानुसार होमिओपॅथिक औषधं, शीत पेय, नारळ पाणी, कफ सिरप, माऊथवॉशच्या सेवनामुळं श्वसनाच्या चाचणीरम्यान अल्कोहोलचं प्रमाण अधिक असल्याचं निदर्शनास आलं आहे. ज्यामुळं कर्मचाऱ्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होऊन रेल्वे संचलनावर याचे थेट परिणाम होत आहेत.

वरील परिस्थितीचा आधार घेत रेल्वेनं एक परिपत्रक जारी केलं असून, त्यात नमूद माहितीनुसार रेल्वेच्या लोको पायलटच्या रक्तांचे नमुने सरकारी लॅबमध्ये आणण्यात आले. यावेळी या नमुन्यांमध्ये अल्कोहोलचं प्रमाण शून्य आढळलं. अर्थात शरीरात नशेचा कोणताही स्तर आढळून आला नाही. पण, ब्रीथ एनालाइजर टेस्टमध्ये मात्र अल्कोहोल आढळलं. रेल्वेच्या माहितीनुसार काही विशिष्ट पदार्थांच्या सेवनामुळं हे निष्कर्ष आढळले असून, त्याचा परिणाम रेल्वे संचलनावर होताना दिसत आहे.

दरम्यान, रेल्वेच्या परिपत्रकानुसार कोणाही रेल्वे कर्मचाऱ्यांनी वरील प्रतिबंधित वस्तूंचं सेवन केलं तर त्यांनी याची पूर्वसूचना ड्यूटीवर असणाऱ्या क्रू कंट्रोलर (CRC) ला लिखीत स्वरुपात देणं बंधनकारक असेल. यानंतर सीआरसीनं ही माहिती केंद्रीय नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत CCRC (लोको पायलट) आणि सहायक मंडल अभियंता (ADEE/OP) यांना द्यावी. एखाद्या व्यक्तीला वैद्यकिय कारणांमुळं अल्कोहोलयुक्त औषध घेणं गरजेचं असेल तर यासाठी रेल्वेतील वैद्यकिय अधिकाऱ्यांची परवानगी इथं आवश्यक ठरणार आहे.

परिपत्रकानुसार जर एखादा कर्मचारी कोणत्याही वैध कारणाशिवाय ब्रीथ एनालाइजर टेस्टमध्ये अल्कोहोल असल्यासंदर्भातील निष्कर्षात सापडतो तर, अशा प्रकरणात कर्मचाऱ्यानं जाणीवपूर्वक बेजबाबदार वर्तणूक केल्याचं इथं ग्राह्य धरलं जाईल. सदर कर्मचाऱ्यांविरोधात अनुशासनात्मक कारवाई (DAR) करण्यात येणार असून, ही एक गंभीर चूक समजली जाईल असं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *