महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी ।। चालू शैक्षणिक वर्ष आता अंतिम टप्प्यात असून उन्हाळ्यास सुरवात झाली आहे. एप्रिलच्या १५ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा होणार आहे. यंदा पोळ्याला सुटी दिल्याने शाळांना ३ मेपासून उन्हाळा सुटी लागणार आहे. १४ जूनपर्यंत उन्हाळा सुटी असणार आहे आणि १५ जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरवात होणार आहे.
शाळांना वर्षात ७६ सार्वजनिक सुट्या असतात. याशिवाय प्रत्येक महिन्यातील चार रविवार एकत्रित करुन ३६५ दिवसात शाळांना १२४ दिवस सुट्या असतात. उन्हाळा सुरु झाल्याने शाळांमधील विद्यार्थी आतापासूनच मामाला गावाला जाण्याचे स्वप्न रंगवू लागले आहेत. तत्पूर्वी, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरु होऊन दुसऱ्या आठवड्यात संपेल, असे शाळांनी नियोजन केले आहे. १ मे रोजी परीक्षेचा निकाल जाहीर होईल आणि त्यानंतर दोन दिवस शिक्षकांना शाळेत यावे लागणार आहे. ३ मेपासून शाळांना उन्हाळा सुटी असणार आहे.
शाळा-विद्यार्थ्यांना ३ मे ते १४ जून या काळात उन्हाळा सुट्टी राहील. अंतिम सत्र परीक्षेचे तंतोतंत नियोजन करुन शिक्षकांनी व्यवस्थितपणे परीक्षेचे मूल्यमापन करावे. १ मे रोजी विद्यार्थ्यांना निकालपत्रकाचे वाटप होईल. पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पुढच्या वर्गात ढकलण्याची पद्धत आता बंद झाली असल्याने शाळांनी त्या विद्यार्थ्यांचे पेपर जतन करुन ठेवावेत.
– कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर