महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. २५ फेब्रुवारी ।। मुंबई आणि इतर परिसरात गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उष्णतेत सोमवारी आणखी वाढ झाली. आजही अशीच तीव्र गर्मी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, विशेषतः घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अत्याधिक उन्हामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे पाणी आणि सावलीचा योग्य वापर करावा.
मुंबई आणि परिसरात उन्हाची तीव्रता वाढत असून, येत्या बुधवारपर्यंत तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. सोमवारी सांताक्रूझ येथे तापमान ३८.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे गेल्या ५ वर्षांतील फेब्रुवारी महिन्यातील उच्चांकी तापमान ठरले आहे. दमट हवामानामुळे मुंबई आणि कोकणातील नागरिकांना उष्णतेचा अधिक त्रास जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारी घरात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, उष्णतेपासून बचावासाठी भरपूर पाणी आणि द्रवपदार्थांचे सेवन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
फेब्रुवारी महिन्यातच तापमानाने ३५ अंश सेल्सिअस पार केली असून, सोलापूर आणि नागपूर येथे पारा ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. संभाजीनगरमध्येही उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. अलिकडच्या काळात ऋतूंमध्ये मोठा बदल होताना दिसत आहे. यंदा होळीपूर्वीच तापमान झपाट्याने वाढले आहे. पुढील दोन दिवस उन्हाचा तीव्र प्रभाव राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी. विशेषतः पाण्याची बाटली सोबत ठेवण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
Yellow Alert issued by IMD for heatwave in Mumbai & Thane for 25-26th February🚨
Take Care Mumbaikars! pic.twitter.com/qbqWDDKFk2— Mumbai Nowcast (@s_r_khandelwal) February 24, 2025
मंगळवार आणि बुधवार उष्णतेच्या लाटेची तीव्र शक्यता असून, सोमवारी मुंबईसह कोकणात तापमान वाढले. नांदेड, परभणी आणि जालना येथेही पारा चढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्याच्या हवामान स्थितीनुसार यंदा उन्हाळ्याची सुरुवात अपेक्षेपेक्षा लवकर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, २६ फेब्रुवारीला पालघरमध्येही उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम नागरिकांच्या खरेदीवरही दिसून येत असून, कलिंगड आणि द्राक्षांसारखी थंडावा देणारी फळे मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहेत. त्यामुळे बाजारपेठेत या फळांना वाढती मागणी असून, विक्रीतही वाढ झाली आहे.