महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. २५ फेब्रुवारी ।। भारतीय संघाची सेमी-फायनल किती तारखेला आणि कुठे होणार हे स्पष्ट झालं आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती…
भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सेमी-फायनलसाठी पात्र ठरला आहे. सोमवारी रावळपिंडी येथे झालेल्या सामान्यामध्ये अ गटातील न्यूझीलंडच्या संघाने बांगलादेशला पराभूत केलं. या विजयाबरोबरच बांग्लादेश आणि पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला असून अ गटातून भारत आणि न्यूझीलंड सेमी-फायनलसाठी पात्र ठरले आहेत.
भारत आणि न्यूझीलंडचा संघ 2 मार्च रोजी एकमेकांशी भिडणार आहेत. मात्र या सामन्याला आता फारसं महत्त्व राहिलं नसून केवळ ग्रुप स्टेजमध्ये कोणास संघ पहिल्या क्रमांकावर असणार हे निश्चित होईल. न्यूझीलंडच्या संघाने बांगलादेशचा 5 विकेट्स राखून पराभव करत सेमी-फायनलमध्ये आपलं आणि भारताचं स्थान निश्चित केलं. यापूर्वी कराचीमध्ये झालेल्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला 60 धावांनी धूळ चारली होती. त्यानंतर त्यांनी बांगलादेशला पराभूत करत सेमी-फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे.
दुसरीकडे भारतानेही याच दोन्ही संघांना पराभूत केलं आहे. दुबईच्या मैदानावरच भारताने आधी बंगलादेश आणि नंतर पाकिस्तानला पराभूत केलं आहे.
आता पाकिस्तान आणि बंगलादेश सामन्यालाही फारसं महत्त्व राहिलेलं नाही. हा सामना 27 तारखेला रावळपिंडीमध्ये खेळवला जाणार आहे. यामध्ये दोन्ही संघांना आपल्या नावावर किमान एखादा विजय नोंदवण्याची शेवटची संधी मिळेल. भारत आणि न्यूझीलंडदरम्यानच्या सामन्याचा निकाल काहीही लागला तरी भारत आणि न्यूझीलंड पहिला सेमी-फायनल खेळणार की दुसरी हे आताच निश्चित झालं आहे.
भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याने भारत पहिली सेमी-फायनल खेळणार हे निश्चित झालं आहे कारण ही सेमी-फायनल दुबईच्या मैदानात होणार आहे. दुसरी सेमी-फायनल न्यूझीलंड खेळेल कारण ही लाहोरमध्ये खेळवली जाणार आहे. पहिली सेमी-फायनल 4 मार्च रोजी होणार असून दुसरी सेमी-फायनल 5 मार्च रोजी होणार आहे. अ गटामधील चित्र स्पष्ट झालं असलं तरी ब गटामधील चुरस अजून कायम आहे. ब गटातील सर्वच संघ पात्र होण्याच्या शर्यतीत आहेत. या गटामध्ये इंग्लड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे.
ब गटातील कोणताही संघ स्पर्धेबाहेर गेला नसला तरी सध्याची स्थिती पाहता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ सेमी-फायनलसाठी पात्र ठरण्याची शक्यता अधिक आहे. इंग्लंड आणि अफगाणिस्तानने एक एक सामना गमावल्याने ते पात्र होण्याची शक्यता धुसर असली तरी ती पूर्णपणे संपलेली नाही.
