महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. २५ फेब्रुवारी ।। कात्रज – कात्रज चौक खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेणार आहे. तब्बल २८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चौकातील बहुचर्चित जागेचे भूसंपादन झाले आहे. जागामालकांकडून एकूण ६२ गुंठे जागेपैकी ३९ गुंठे जागेचा ताबा राज्य सरकारकडे आणि सरकारच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेकडे देण्यात आला.
याची रितसर कार्यवाही चौकात अधिकाऱ्यांच्या समक्ष उपस्थित राहून करण्यात आली. या जागेसाठी महापालिकेकडून मिळकतीचा रोख मोबदला म्हणून २१ कोटी रुपयांची रक्कम जागामालकांना अदा करण्यात आली आहे.
सदर कार्यवाहीमुळे मुख्य चौक व कोंढवा रस्त्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या जागेच्या भूसंपादनासंबधी सकाळच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या ६० मीटर डीपी रस्त्याच्या प्रश्न मार्गी लागणार असून रस्ता आता सरळ होणार आहे. मात्र, या रस्त्याच्या भूसंपादनाअभावी झालेल्या वाहतूक कोंडी व अपघातात अनेकांना जीव गमवावे लागल्याने ‘देर आये दुरुस्त आये अशीही भावना काही नागरिकांतून व्यक्त होत आहे.
जागा हस्तांतरणासाठी रोख मोबदल्याच्या मागणीसाठी संजय रमेश गुगळे, अंकित मदनराज साखरिया यांनी या बाबत न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता स्वयंखुशीने गुगळे यांनी मोबदला स्वीकारून जागेचा ताबा दिल्याने प्रश्न मार्गी लागला आहे.
सदर कार्यवाही आयुक्त डॉ. राजेन्द्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज पी बी यांच्या मार्गदर्शनाखाली भूसंपादन व व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांनी केली. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश कदम, वसंत मोरे, स्वराज बाबर, उपअभियंता दिलीप पांडकर, दिंगबर बांगर, शाखा अभियंना रुपाली ढगे, संतोष शिंदे, भूसंपादनचे हर्षद घुले, अजिंक्य पाटील उपस्थित होते.
ढाकणे यांच्याकडून कार्यवाहीला सुरवात
चौकातील जागेसाठी लोकप्रतिनीधी, स्थानिक नागरिक यांच्यासह विविध संस्था स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र, जागा ताब्यात घेण्यासाठी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी कार्यवाहीला सुरवात करत जागेसाठी २१ कोटी रुपयांच्या रोख मोबदल्यासाठी मंजुरी दिली होती.
विशेष भूसंपादन अधिकारी-१६ व महापालिका भूसंपादन विभाग यांनी गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करत प्रत्यक्ष जागा ताब्यात घेतली. त्यामुळे कात्रज मुख्य चौकातील रस्ता सरळ होणार असून वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
प्रतिक्रिया
अनेक दिवसांपासून हा प्रश्न रखडला होता. मात्र, आता सामंजस्यातून आम्ही जागेचा ताबा दिला आहे. यामध्ये काही अडचणींमुळे अनेक वर्षे स्थानिकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. मात्र, आता ३९ गुंठे जागेचा ताबा दिला असल्याने महापालिकेला रस्ता सुरवात करण्यास कोणतीही अडचण नाही.
– संजय गुगळे, जागामालक
ही जागा महत्वाच्या ठिकाणची असल्याने अडचणी येत होत्या. मात्र, आता जागा ताब्यात आल्याने तातडीने आम्ही कार्यवाही करणार आहे. रस्ता सुरु करणार असून वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल.
– अनिरुद्ध पावस्कर, अधिक्षक अभियंता, पथविभाग