महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. २५ फेब्रुवारी ।। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना एसटी महामंडळाबाबत घेतलेले निर्णय हे आगामी काळात रद्द होतील की काय? अशी चर्चा आता सर्वत्र सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवास आणि महिलांना एसटीच्या तिकीटात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. हाच निर्णय आता महायुती सरकार मागे घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामागे कारणही तसं आहे. एसटी महामंडळ सध्या प्रचंड आर्थिक अडचणीतून जात आहे. एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांचा गेल्या तीन ते चार महिन्यांपासून पीएफचे पैसे देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे याबाबत उलटसुटल चर्चांना उधाण आलं आहे. अखेर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
“असं काहीही बैठकीत चर्चा वगैरे नाही. काहीतरी चुकीच्या बातम्या प्रसारित होत आहेत. एसटी महामंडळाच्याबाबत आणि या राज्याच्या हितासाठी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना जे निर्णय घेतले त्यामध्ये कुठेही बदल झालेले नाहीत. किंवा ज्या योजना त्यांनी चालू केल्या त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही”, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं.
“एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना एसटी महामंडळाच्या बाबतीत काही निर्णय घेतले होते. महिलांना एसटीच्या तिकीटात 50 टक्के सवलत दिली होती. त्याचबरोबर 75 वर्षांपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची मूभा दिली होती. अशा प्रकारचे जे काही निर्णय घेतले होते ते काही बंद होणार नाहीत. ते तशेच अबाधित ठेवून आम्ही एसटी पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करतोय. एसटीचं उत्पन्न पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करतोय. त्या माध्यमातून अर्थ खात्याने आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे”, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली.